Nashik | ‘आयटीआय’मध्ये आले अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे अंतिम प्रमाणपत्र; विद्यार्थ्यांना कसा घेता येईल लाभ?
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 01 शासकीय आयटीआय सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय आहेत.
नाशिकः शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे अंतिम राष्ट्रीय शिक्षुता (Apprenticeship) प्रमाणपत्र नाशिक जिल्ह्यातील सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिकाऊ उमेदवारांनी आपले प्रमाणपत्र त्वरीत घेवून जावे, असे आवाहन सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. एस. उनवणे यांनी केले आहे. अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा सत्र 1980 पासून ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत उत्तीर्ण झालेल्या बहुतांशी उमेदवारांनी आपले शिक्षुता प्रमाणपत्र नेलेले नाही. त्यामुळे त्यांना मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, नवी दिल्ली यांच्या मार्फत अंतिम राष्ट्रीय शिक्षुता (National Apprenticeship Certificate) प्रमाणपत्र जिल्ह्यातील सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी हे प्रमाणपत्र घेण्यासाठी मूळ गुणपत्रिका, आधार कार्ड किंवा ओळखपत्राची एक सत्यप्रत सादर करणे बंधनकारक आहे.
दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश
इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून 2 वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या 2 भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी नापास उमेदवारांनी आयटीआयमधून 2 वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या 2 भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येणार आहे. आयटीआय संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो.
417 शासकीय आयटीआय
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 01 शासकीय आयटीआय सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी 04 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र 02 संस्था व 43 शासकीय आयटीआमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात एकूण 549 खाजगी आयटीआय आहेत.
इतर बातम्याः
Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…
टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?
Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?