चंद्रपुरात खळबळ, जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे चंद्रपूर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
निलेश दहात, चंद्रपूर : चंद्रपूरमधून (Chandrapur) एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात या बातमीने खळबळ माजली आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा (Vinay Gauda) यांना अटक करण्याचे आदेश निघाले आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांविरोधात समन्स जारी केला होता. मात्र या समन्सचे पालन न केल्यामुळे आयोगाने विनय गौडा यांच्या अटकेचे कठोर आदेश दिले आहेत. आदिवासी जमीन प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांवर आहे. या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती आयोगाने विनय गौडा यांना समन्स बजावला होता.
काय आहे नेमकं प्रकरण?
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कुसुंबी गावातील आदिवासी जमिनीचं हे प्रकरण आहे. या प्रकरणी विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासी लोकांच्या जमिनींवर अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याचा आरोप येथील आदिवासी कुटुंबांनी केला आहे. पीडित आदिवासींनी या प्रकरणी वेळोवेळी तक्रार केली आहे. अनेक वर्षांपासून त्यांचा न्यायालयीन लढाही सुरु आहे. विनोद खोब्रागडे यांनी यांनी या प्रकरणी आदिवासी जाती जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना १६ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
विनय गौडा यांनी हे आदेश न पाळल्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे चंद्रपूर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.