विद्यार्थिनींना चेंजिग रूममध्ये दिसली अशी वस्तू पाहाताच फुटला घाम, पालकही हादरले, पुण्याच्या शाळेतील धक्कादायक प्रकार
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या एका शाळेच्या चेंजिग रूमध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पाषाण परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे शाळेतीलच एका शिपायानं हा व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या शिपायाला अटक केली आहे, तुषार सरोदे असं या आरोपी शिपायाचं नाव आहे. शाळेतील किचनरूममध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थिनीचा व्हिडीओ तो चित्रीत करत होता. या प्रकरणात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ६ जानेवारी रोजी घडला आहे. शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले असता त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेऊन रूममध्ये असलेल्या एका स्विच बोर्डवर ठेवला.
दरम्यान, हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि तात्काळ त्यांनी व्हिडीओ मोबाईल मधून डिलीट केला. घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने या प्रकाराला नकार दिला.
मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याच्याकडे चौकशी केली असता त्याने घडलेल्या घटनेची कबुली दिली. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सरोदे याला अटक केली. आरोपीच्या विरोधात पोक्सो सह बी.एन.एस कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे, पालकांमध्ये भीतीचं वातावरण असून, घटनेबाबत अधीक तापस सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.