पंचायत समिती सदस्य ते सलग सातवेळा आमदार, माजी मंत्री मधुकर पिचड यांचा जीवन परिचय
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नाशिकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नाशिकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड यांच्या निधनामुळे राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री होते. मधुकर पिचड यांनी आदिवासी समाजासाठी मोठं काम केलं. आदिवासी समाजाचे प्रश्न त्यांनी सातत्यानं विधानसभेत मांडले. ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
मधुकर पिचड यांचा परिचय
मधुकर पिचड यांचा जन्म 1 जून 1941 साली महादेव कोळी समाजात झाला. त्यांचं मुळ गाव हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजुर हे आहे. त्यांचे वडील शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी आपलं बी ए एल एल बी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी तिथूनच राजकारणाला सुरुवात केली. ते १९७२ ला अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर १९७२ ते १९८० पर्यंत ते पंचायत समितीचे सभापती होते. १९८० पासून ते 2009 पर्यंत ते सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले. १९९५ ते जुलै १९९९ या काळात त्यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची धुरा देखील सांभाळली.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी पार पाडली. मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला आहे. ते राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला त्यांनी अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले.
२०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला. मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली. त्यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला.