नव्या लालपरीच्या पायऱ्या चढताना का लागतोय दम, दरवाज्याचे जिने बदलण्याची होत आहे मागणी
एसटी महामंडळाने आपल्या दापोडीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत बांधलेल्या नव्या लालपरीतून आरामदायी प्रवासाची हमी दिली जात आहे. परंतू ज्येष्ठ नागरिकांना काही अडचणी येत आहेत.
मुंबई : एसटी महामंडळाने ( MSRTC ) आपला लोकप्रिय ‘हिरकणी’ आणि साधी ‘लालपरी’ चा ब्रँड पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या तीन कार्यशाळांमध्ये टाटा कंपनीच्या सातशे चॅसिसवर नवीन गाड्यांची बांधणी सुरू आहे. मात्र, या बसेस तयार करताना एसटी महामंडळाने प्रवाशांची सोय विचारात घेऊन बांधणी केलेली नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची ( senior citizen ) गैरसोय होत आहे. पुण्याच्या दापोडी कार्यशाळेतून तब्बल 145 नवीन गाड्यांची बांधणी पूर्ण होऊन राज्यभरात त्यांचे वितरण झाल्यानंतर प्रवाशांच्या या गाड्यांबाबत तक्रारी आल्या आहेत.
एसटीच्या तब्बल 42 एकरवर वसलेल्या पुण्यातील दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत एकूण सातशे नवीन गाड्यांची बांधणी सुरू आहे. यापैकी 145 ‘बीएस-6’ क्षमतेच्या गाड्या कार्यशाळेत बांधून बाहेर पडल्या आहेत. या बसेस ॲल्युमिनियम ऐवजी ‘माईल्ड स्टील’ ( एमएस ) बांधणीच्या आहेत. परंतू या बसमध्ये चढताना आणि उतरताना जिन्यांमध्ये खूपच अंतर ठेवल्याने ज्येष्ठ नागरिकांची आणि विशेषत: महिलांची पंचाईत होत आहे. या गाड्यांची उंची कमी आहे. त्यामुळे उंच माणसांना उभ्याने प्रवास करतानाही त्रास होत आहे.
या आहेत त्रुटी
एसटीच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतून 500 साध्या ‘लालपरी’ पैकी 145 बसेस तयार होऊन बाहेर पडल्या आहेत. ‘बीएस-6’ दर्जाच्या या बसेसमध्ये दरवाजा आतील बाजूस उघडतो. परंतू पायऱ्या चढताना आणि उतरताना सिनियर सिटीझनना त्रास होत आहे. दरवाजाजवळील तीन पायऱ्यांची उंची कमी करायला हवी अशी मागणी होत आहे.
एसटीच्या या नवीन बसेसची उंची कमी आहे. उभ्या प्रवाशांना पकडण्यासाठी केवळ 11 हॅण्डल आहेत. या बसेसना मोबाईल ‘चार्जिंग पॉईंट’ प्रवाशांच्या डोक्यावरच्या दिशेला सामान ठेवण्याच्या रॅक खाली दिले आहेत. आता नवीन बसेसमध्ये आसनाजवळ मोबाईल ‘चार्जिंग पॉईंट’ देण्यात येतील तसेच नवीन गाड्यांची बांधणी करताना आधीच्या त्रूटी दूर करण्यात येतील असे दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक दत्तात्रय चिकोर्डे यांनी टीव्ही नाइन मराठीशी बोलताना सांगितले.
थडथड, खडखड नाही…हानी कमी !
नवीन बसेस ॲल्युमिनियम ऐवजी ‘माईल्ड स्टील’ ( एमएस ) बांधणीच्या आहेत. आपल्या ताफ्यात तीस टक्क्यांहून अधिक ‘माईल्ड स्टील’ बसेस असणारे एसटी महामंडळ देशातील 14 सार्वजनिक परिवहन संस्थांपैकी एकमेव परिवहन संस्था बनले आहे. ॲल्युमिनियममुळे अपघातात हानी जास्त होते. स्टील बांधणीमुळे तो धोका कमी होतो. आणि खिडक्यांचा थडथड, खडखड आवाज होत नाही.