Serum Institute Fire : सीरमची आग शॉर्टसर्किटमुळे, कोव्हिशील्ड लस सुरक्षित- मुख्यमंत्री
सीरम इन्स्टिट्यूटची आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसंच कोव्हिशील्ड ही लस सुरक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
मुंबई : कोव्हिशील्ड लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूलला लागलेली आग आता नियंत्रणात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसंच कोव्हिशील्ड ही लस सुरक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लसीची निर्मिती केली जाते, त्या इमारतीला आग लागली होती, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय.(CM Uddhav Thackeray predicts that the fire at Serum Institute was caused by a short circuit)
दरम्यान आग लागली त्यावेळी 6 जण त्या इमारतीत अडकून पडले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पुणे अग्निशमन दलानं मोलाचं काम केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आता सर्व आग विझू द्या, अदर पुनावाला यांच्याशी संपर्क करुन आगीच्या कारणाची माहिती घेतली जाईल. त्यानंतर सर्व माहिती दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
‘त्यांना’ संयमाची लस टोचण्याची गरज
दरम्यान, भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीमागं घातपाताची शंका येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसंच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आग लागली की लावली? असा सवाल केला आहे. त्याबाबत बोलताना त्यांच्याकडे अन्य कुठली माहिती असल्यास आपल्याला माहिती नाही. मात्र, त्यांना संयमाची लस टोचण्याची गरज असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
मुक्ता टिळक काय म्हणाल्या?
“दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळतेय. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी नाही. हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे”, अशी माहिती भाजप आमदारा मुक्ता टिळक म्हणाल्या.
‘कोव्हिशील्ड’ लस सुरक्षित
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली होती. मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात ही आग लागली होती. मात्र, सुदैवानं कोव्हिशील्ड लस सुरुक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचं काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला असलेल्या गेट आहे, तिथे ही आग लागली आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नसल्याची माहिती मिळत आहे.
संबंधित बातम्या :
Serum Institute Fire : सीरमच्या आगीमागे घातपाताची शंका, भाजप आमदाराकडून संशय व्यक्त
Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग
CM Uddhav Thackeray predicts that the fire at Serum Institute was caused by a short circuit