काळू नदीवर पूल व्हावा यासाठी लढा देणाऱ्याचा बुडून मृत्यू, दशक्रिया विधींसाठी गेले अन्…
गेल्या कित्येक वर्षांपासून काळू नदीवर पूल व्हावा यासाठी लढा देत होते. मात्र त्यांचा या नदीत बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहापूर आणि मुरबाड तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या काळू नदीपात्रात दशक्रिया विधीसाठी गेलेल्या रहिवाशांची होडी बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण बचावले आहेत. भाऊ शेलार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते गेल्या कित्येक वर्षांपासून काळू नदीवर पूल व्हावा यासाठी लढा देत होते. मात्र त्यांचा या नदीत बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मुरबाड तालुक्यातील हिरेघर या ठिकाणी राहणारे काही रहिवाशी शहापूर तालुक्यातील गंगा गोरजेश्वर देवस्थान, मढ येथे काल दशक्रिया विधीसाठी आले होते. या विधीसाठी होडी घेऊन नदीपात्रात गेलेल्या रहिवाशांची होडी बुडाल्याची दुर्घटना घडली. या होडीत एकूण 6 जण बसले होते. यावेळी 5 जणांनी कसाबसा करुन नदीचा तीर गाठला. तर भाऊ शेलार हे मात्र अयशस्वी झाले. त्यांचा या नदीत बुडून मृत्यू झाला.
भाऊ शेलार हे गेल्या कित्येक वर्षांपासून काळू नदीवर पूल व्हावा यासाठी शासन दरबारी आणि लोक प्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करत होते. मात्र दुर्देवाने भाऊ शेलार हे होडीतून प्रवास करत असताना होडी बुडून मोठी दुर्घटना घडली. त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना असून यामुळे मुरबाड, शहापूर व कल्याण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. भाऊ शेलार यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक १३ वर्षाचा मुलगा आहे.
आता तरी प्रशासनाला जाग येईल का?
काळू नदीवर पुल व्हावा म्हणून ज्यांनी लढा दिला त्यालाच आपला जीव गमवावा लागला, अशा शब्दात दु:ख व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर आता तरी प्रशासनाला जाग येईल का? की अजून काही भाऊ शेलार यांच्या सारख्यांना आपला जीव गमवावा लागेल? असा सवाल उपस्थित होत आहे.