संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट… कुणी केला हल्लाबोल?
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी मनसेबाबत केलेल्या विधानावर शंभूराज देसाई यांनी खोचक टीका केली आहे. ‘संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे, आतापर्यंत काढलेली एकही चिठ्ठी खरी ठरलेली नाही. राऊत जे पण बोलले ते आजपर्यंत कधीही खरं झालेलं नाही. राऊत हे हवेत विधान करत असतात, त्यामुळे या विधानानांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असं देसाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पारदर्शक निवडणूक करायची असेल तर रश्मी शुक्ला यांना हटवा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं, याला देखील शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. संजय राउतांकडे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुरावे असतील तर ते त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यावेत. उगाचच येवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर खोटे आरोप करू नये, असं देसाई यांनी म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटानं काय सूत्र स्वीकारले हा त्यांचा त्यांचा विचार आहे. मात्र त्यांना त्यांच्या स्थानिक शिवसैनिकांना सोडून बाहेरच्यांना उमेदवारी द्यावी लागते. यावरूनच मूळ शिवसेना कोण आहे, निष्ठावंत कोण आहेत, हे यावरून सिद्ध होते. यामुळे शिवसेना ठाकरे गटातील लोकांनी मुख्य शिवसेनेकडे आले पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
सर्व पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत बंडखोरी सुरू असते. अनेक जण वेगवेगळ्या कारणातून उमेदवारी अर्ज भरत असतात. प्रत्येक पक्ष हा संबंधित बंडखोरी करणाऱ्या वक्तीबाबत अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. पक्षाला कोणतेही नुकसान पोहोचू नये यासाठी सर्व स्तरातून आम्ही प्रयत्न करत असतो, असंही यावेळी देसाई यांनी म्हटलं आहे. आता देसाई यांच्या टीकेला संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.