अहमदनगर: शनिशिंगणापूर (Shanishingnapur) येथील चौथऱ्यावर जावून भक्तांना आता देवाला स्वतः तेलाचा अभिषेक करता येणार आहे. शनिदेव संस्थानकडून शनिवारपासून ही सशुल्क सेवा (Paid service) सुरू करण्यात आली आहे मात्र भक्तांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Bhoomata Brigade Tripti Desai) यांनी आक्षेप घेतला आहे. महिला व पुरुष भक्तांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन व तेलाभिषेक करता येणार असल्याने ट्रस्टींच्या या निर्णयाचे स्वागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे, मात्र 500 रुपयांच्या पावतीचा निर्णय चुकीचा असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
हा निर्णय गरीब आणि श्रीमंत भक्तांमध्ये भेदभाव करणारा आहे. या निर्णयाला आमचा विरोध असून हा निर्णय विश्वस्त मंडळाने मागे घ्यावा अन्यथा भूमाता ब्रिगेड आवाज उठवणार असल्याचा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
राज्यातील शनिशिंगणापूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे राज्यासह कर्नाटक, गुजरात या राज्यातूनही या ठिकाणी शनिभक्त दर्शनासाठी येत असतात.
भक्ती असल्याने अनेक भाविक या ठिकाणी शनिदेवाला तेलाचा अभिषेक घालतात. ही परंपरा असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने शनिदेवावर तेल अर्पण करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भाविकांची उपस्थिती या मंदिरात असते. शनिदेव संस्थानकडून शनिवारपासून ही सशुल्क सेवा सुरू करण्यात आल्याने राज्यातून आणि बाहेरून येणाऱ्या सामान्य भाविकांना 500 रुपये आता लागणार आहेत. त्यामुळे गरीब आणि सामान्य माणसांना याचा मोठा फटका बसणार असल्याने भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी विरोध दर्शविला आहे.
ज्या भाविकांना शनिदेवाला तेल अभिषेक करायचा आहे, त्यांना देणगी म्हणून 500 रुपाये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे भूमाता ब्रिगेडकडून या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. या देणगीमुळे गरीब आणि सामान्य भक्त जे येणार आहेत, त्यांना त्यापासून वंचित राहावे लागणार त्यामुळे तृप्ती देसाई यांनी सांगितले की, विश्वस्तांनी हा निर्णय जरी घेतला असला तरी या निर्णयामुळे गरीब श्रीमंतर अशी दरी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.