शेतकरी आंदोलनात पाठिंबा दिल्यामुळेच गुन्हा, शंतनू यांच्या कुटुंबियांचा केंद्र सरकारवर आरोप
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात शंतनूच्या आई वडिलांचीही चौकशी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी शंतनूच्या कुटुंबियांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलाय.
बीड : दिल्लीतील शेतकरी आंदोलन भडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरण थेट बीड जिल्ह्यापर्यंत येऊन ठेपलं आहे. बीड शहरातील शंतनू शिवलाल मुळूक यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचं एक पथक बीडमध्ये दाखल झालं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात शंतनू यांच्या आई वडिलांचीही चौकशी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी शंतनूच्या कुटुंबियांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलाय.(Shantanu Muluk’s parents in Beed make serious allegations against the central government)
शंतनू यांची नाहक बदनामी केली जात आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणूनच हा गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप शंतनू यांच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या पथकाने शंतनूच्या आई-वडिलांची चौकशी करतानाच त्याच्या बँक खात्याचीही तपासणी केली आहे. यावरुन शंतनू यांच्या कुटुंबियांनी आता केंद्र सरकावर गंभीर आरोप केला आहे.
शंतनू मुळूक हे मूळचे बीडचे आहेत. सध्या ते दिल्लीत राहत आहेत. टूलकिट प्रकरणात त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून ते गायब आहेत. त्यामुळेच त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस बीडमध्ये दाखल झाले असून शंतनू यांच्याविषयची अधिक माहिती मिळवत आहेत.
दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद
पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी टूलकिट दस्ताऐवज तयार केले होते. तसेच झूम अॅपवरून या तिघांनी मिटिंग करून अपप्रचार करण्याचं षडयंत्र रचलं होतं, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. टूलकिट षडयंत्रामध्ये पोएटिक फाऊंडेशन सहभागी होता. टूलकिटमध्ये चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. आंदोलन फोफावण्यासाठी जानेवारीत टूलकिट तयार करण्यात आलं. हे आंदोलन विदेशापर्यंत पोहोचावं आणि परदेशातील भारताच्या दूतावासाला टार्गेट करता यावं म्हणून हा सगळा प्रकार करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.
11 जानेवारीला मिटींग
11 जानेवारी रोजी एक झूम मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये निकिता, शंतनू आणि दिशा रवी सहभागी झाले होते. या बैठकीला एमओ धालीवालही उपस्थित होते. 26 जानेवारीपूर्वीच ट्विटर स्टॉर्म तयार करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. पोलिसांच्या दाव्यानुसार या बैठकीला 60 ते 70 लोक उपस्थित होते.
पाच दिवसांची कोठडी
दिशा आणि निकिताच्या लॅपटॉपमधून काही आक्षेपार्ह माहितीही मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात दिशा रवी, निकिता आणि शांतनू या तिघांचीच नावे समोर आली आहेत. दिशाला शनिवारी बेंगळुरूच्या सोलदेवनहल्ली येथून अटक करण्यात आली आहे. तिला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
टूलकिट नेमकं काय आहे?
टूलकिट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे.
संबंधित बातम्या :
Explainer : ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट नेमकं काय? ते काम कसं करतं?
कोण आहे दिशा रवी? पोलिसांकडून अटक का?; वाचा विशेष रिपोर्ट!
Shantanu Muluk’s parents in Beed make serious allegations against the central government