‘शरद पवार आणि कॉंग्रेसने मुघलांप्रमाणे…’, भाजप नेत्याचं मनोज जरांगे पाटील यांना आवाहन काय?
गर्दी ही मराठा समाजाला काही नवीन नाही. पन्नासहून अधिक मोर्चे निघाले तेव्हादेखील गर्दी झाली होती. ही गर्दी आरक्षणासाठीची ही गर्दी आहे, ही गर्दी आहे, न्याय हक्काची गर्दी आहे. हे कुठल्या एका नेत्याचे नेतृत्व नाही.
मुंबई : 15 ऑक्टोबर 2023 | मराठा आरक्षणावरून राज्यात नवे वादळ निर्माण करणारे मनोज जरांगे पाटील यांना भाजप नेत्याने महत्वाचं आवाहन केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसवरही या नेत्याने टीका केलीय. जरांगे पाटील आपला आदर आहे. समाजासाठी काम करता हे देखील मान्य आहे. पण, ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला चालवलं जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो. पन्नास वर्षाच्या इतिहासानंतर ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले हे विसरू नका असेही हा नेता म्हणाला.
हे देखील समाजाला सांगावे
भाजप नेते, आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करताना महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होतोय असे म्हटलंय, मराठा समाजाला याची विचार करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने मराठा म्हणून मराठा आंदोलक म्हणून, कार्यकर्ता म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं. 2018 मध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं. पण, उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये अडीच वर्षात पाठपुरावा केला नाही त्यामुळे हे आरक्षण गेलं हे देखील समाजाला सांगावे लागेल, असे प्रसाद लाड म्हणाले.
कुठल्या एका नेत्याचे नेतृत्व नाही
आपल्याला ओबीसीमध्ये आरक्षण हवंय. पण, आम्हाला शंभर टक्के पूर्ण आरक्षण हवंय. जे देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गर्दी ही मराठा समाजाला काही नवीन नाही. त्यावेळी पन्नासहून अधिक मोर्चे निघाले तेव्हादेखील गर्दी झाली होती. समाजाने ते पाहिले आहे. या समाजाच्या भावना आहेत. हे कुठल्या एका नेत्याचे नेतृत्व नाही, असा टोला त्यांनी जरांगे पाटील यांना लगावला.
तुमचा बोलवता धनी काम करून घेतोय
ज्या पद्धतीने तुमचा बोलवता धनी तुमच्याकडून काम करून घेतोय. तुम्ही ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे. जर तुम्ही मागचा इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले, दोन वेळा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण, बाबासाहेब भोसले हे सगळे मुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं. 1983 मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. त्या मागणीसाठी त्यांनी स्वतःचा देह टाकला. त्यावेळीही मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाहीत. पन्नास वर्षाच्या इतिहासानंतर एका ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आरक्षण दिले हे विसरू नका, असे प्रसाद लाड म्हणाले.
ते काम करू नका
आम्हा मराठ्यांना आरक्षण हवंय ते ही शंभर टक्के आरक्षण हवंय. कुठल्याही ओबीसी, एनटीमध्ये दिलेले आरक्षण नको. हे राज्य सरकार तुम्हाला शंभर टक्के आरक्षण देईल. त्यामुळे मराठा आरक्षणाचा बाऊ करून समाजामध्ये फुट पडण्याचे काम मुघलांनी केले ते काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात करू नका, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. संपूर्ण समाज एक आहे आणि राहील. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले.