शरद पवार यांचा थेट इशारा, मंत्री अनिल पाटील यांच्या पोटात आला गोळा?
अजित पवारांनी विजय शिवतारेंना दिलेला इशारा खरा करून दाखवला. आता काका, शरद पवार, अजित पवार गटातील मंत्र्यांना दिलेला इशारा खरा करणार का? की अजित पवार काकांचं आव्हान स्वीकारून आपल्या मंत्र्याला पुन्हा निवडून आणणार हे आगामी विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
सागर सुरवसे, सोलापूर | 16 नोव्हेंबर 2023 : 2019 ची विधानसभा निवडणुक. याच निवडणुकीत अजित पवार यांनी आता शिंदे गटात गेलेले विजय शिवतारेंना थेट इशारा दिला होता. तसाच इशारा आता शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांना दिलाय. त्यामुळे अनिल पाटलांच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहिला नसेल. पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत. त्याची आम्ही काळजी घेऊ. शरद पवार यांचं हे विधान अजित पवार गटातील आमदार आणि मंत्री अनिल पाटील यांना धडकी भरवणारा आहे. पवार जे बोलतात नेमकं त्याच्या विरोधात करतात अशी त्यांची ख्याती. पण, पवारांचं अनिल पाटलांबद्दलचं हे वक्तव्य म्हणजे पर्यायानं अजित पवारांना थेट इशारा आहे का? असाही प्रश्न आता विचारला जातोय. त्याचं झालं असं की हिवाळी अधिवेशनानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले दिसतील असं वक्तव्य अनिल पाटलांनी नुकतंच केलं. माढा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी पवारांना पाटलांच्या या वक्तव्याबाबत विचारलं असता पवारांनी अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत असा दावा केला.
शरद पवार यांचा अनिल पाटलांवर इतका रोष का? राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा राष्ट्रवादीच्या प्रतोदपदी अनिल पाटलांची निवड केली. त्यांच्यावर विश्वास टाकला. पण, अनिल पाटील अजितदादांसोबत गेले. अजित दादा गटाने त्यांचे प्रतोद पद कायम ठेवले. पाटलांनी पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना व्हीप देखील बजावला होता.
सध्याच्या सत्ता संघर्षात प्रतोद पदाच महत्व किती? हे शिवसेनेच्या वादात पाहायला मिळालं होतं. इतकंच नाही तर अनिल पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक एक करून सगळे आमदार अजितदादांसोबत येतील असा दावा केला होता. त्यामुळेच अनिल पाटील हे शरद पवार यांच्या रडारवर आहेत. त्यामुळे पवारांच्या या इशाऱ्याच्या वक्तव्यानं अनिल पाटलांच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही.
शरद पवार यांनी अनिल पाटलांना दिलेल्या इशाऱ्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील अजित पवारांनी दिलेल्या एका इशाऱ्याची आठवण होते. अजित पवारांनी आता शिंदे गटात असलेले विजय शिवतारे यांना तू निवडून कसा येतो ते बघतोच असा इशारा दिला होता आणि त्या निवडणुकीत शिवतारेंना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती? तुझा आवाका किती? तू बोलतोय कुणाबरोबर? तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ तू. महाराष्ट्राला माहिती आहे. मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही असे अजित पवार म्हणाले होते.