Sharad Pawar : शरद पवार गटाचा दे धक्का? अखेर उमेदवार ठरले? ही यादी आली समोर, शनिवारी होणार घोषणा?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई : महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, शरद पवार यांनी अद्यापही आपली यादी जाहीर केलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला 19, काँग्रेस 16 आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा असे जागावाटप झाले आहेत. तर चार जागांवर अजून निर्णय होणे बाकी आहे. यातील ठाकरे गटाने 17 जागांची यादी जाहीर केली आहे. तर कॉंग्रेसनेही 10 जागांची उमेदवारी यादी जाहीर केली. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकताही आता संपणार आहे. शरद पवार गटाची पहिली यादी शनिवारी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार यांच्या गटाला जागावाटपामध्ये बारामती, शिरूर, सातारा, अहमदनगर, रावेर, दिंडोरी, बीड, वर्धा आणि माढा हे मतदारसंघ मिळाले आहे. यातील बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, अन्य उमेदवार कोण असणार याची यादी शनिवारी जाहीर केली जाणार आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगरमधून नीलेश लंके, दिंडोरीमधून भास्कर भगरे आणि भिवंडीतून बाल्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे हे संभाव्य उमेदवार आहेत असेही या सूत्रांनी सांगितले.
माढा, बीड, रावेर, सातारा आणि वर्धा या मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या पक्षात परतले आहेत. हा अजितदादा यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार निलेश लंके यांना अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात येणार आहे. अहमदनगरमध्ये विखे पाटील आणि लंके यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे. तर, नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या देखील शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
ठाकरे गटाला मिळालेले मतदार संघ :
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, रायगड, मावळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणगले, हिंगोली, शिर्डी, औरंगाबाद, यवतमाळ-वाशीम आणि धाराशिव.
काँग्रेसकडे असलेले मतदारसंघ
नंदुरबार, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, मुंबई उत्तर मध्य, सोलापूर, नागपूर, पुणे, लातूर, जालना, अकोला, अमरावती, भंडारा-गोंदिया, कोल्हापूर आणि रामटेक.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेले मतदार संघ
बारामती, शिरूर, सातारा, अहमदनगर, रावेर, दिंडोरी, बीड, वर्धा आणि माढा
चार जागांवर निर्णय होणे बाकी
सांगली, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, भिवंडी