मी स्वतःच सांगितलं होतं माझा निषेध करा, विरोधात घोषणा द्या… शरद पवार यांनी सांगितलेला किस्सा काय?
सध्या कांद्याचा विषय चांगलाच तापलेला आहे. त्यामध्ये शरद पवार यांनी कृषीमंत्री असतांना संसदेत घडलेला किस्सा सांगितला आहे. त्याची चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे.
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : सध्या राज्यात कांद्याचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत नसल्याने शेतकरी ( Onion Farmer ) वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. त्याचेच पडसाद राज्यात सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. तरी देखील शेतकऱ्यांना झालेला उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट अशा दुहेरी संकटाचा सामना करत कांद्याला आपल्या पोटच्या पोरासारखा जपत असतो. तरीदेखील कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र पाहायला मिळतंय.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी कृषिमंत्री असतानाचा एक किस्सा जाहीर भाषणात सांगितला आहे. अहमदनगर येथे एका कार्यक्रमात बोलत असतांना कांद्याच्या बाबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे.
सध्या कांद्याचा प्रश्न चर्चेत आहे. त्यावरच भाष्य करत असतांना कांद्याचा प्रश्न संसदेत मांडणार असल्याचे सांगत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे म्हंटले आहे. त्याचवेळी कृषीमंत्री असतांना संसदेत काय घडलं होतं हे सांगून टाकलं आहे. त्याची चर्चा राज्याच्या राजकारणात आता होऊ लागलेली आहे
शरद पवार कृषीमंत्री असताना भाजपच्या काही खासदारांनी संसदेमध्ये कांद्याच्या माळा घालून येत कांद्याचे भाव कमी करा म्हणून मागणी केली होती. भाजपच्या खासदारांनी संसदेत प्रश्न मांडला होता त्यावर अध्यक्षांनी संसद भावणाला हे उत्तर द्या म्हणून सांगितले होते.
त्यावर मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती, तुम्ही माझ्या विरोधात निषेध करा, आंदोलन करा, पण तरीही मी कांद्याचे दर कमी करणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी माझी भूमिका ही स्पष्ट होती मी शेतकऱ्यांची त्यावेळेला बाजू घेतली होती.
त्याचं कारण म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधीतरी दोन पैसे मिळत आहे आणि तुम्ही ज्या कांद्याबद्दल सांगत आहे त्या कांद्यामुळे तुमच्या घरखर्चात किती वाढ होत आहे ? असा मी त्यांना प्रश्न विचारला होता आणि सांगितले होते कांद्याचे भाव कमी होणार नाही.
कांद्याला 70 हजाराच्या वर खर्च आणि भाव जर दोन तीन रुपये मिळत असेल तर शेतकऱ्याने आत्महत्या करायची का ? शरद पवार यांनी अहमदनगर येथील एका कार्यक्रमात जाहीर भाषण करत असतांना हा किस्सा सांगितला आहे.
सध्या कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरलेले असताना शेतकऱ्यांचा रोष वाढत असताना जुना किस्सा सांगितल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने मी कायम उभा आहे असेही शरद पवार यांनी म्हंटलं आहे.