अहमदनगर : मंगळवारी राज्यात ईडीच्या कारवाईचा धडका लागला होता, ईडीने थेट शिवसेना खादसार संजय राऊत यांचीच मालमत्ता जप्त केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात कालचा दिवस तर कडाक्याच्या उन्हाळ्यातल्या दुपारपेक्षाही तापलेला राहिला. त्यानंतर रात्री दिल्लीत पुन्हा एकदा आपल्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडून आले. कारण शरद पवारांच्या दिल्लीतल्या (Sharad Pawar) निवासस्थानी नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि संजय राऊत स्नेहभोजनला एकत्र दिसून आले, त्यानंतर आजचा दिवस चर्चेत राहिला तो म्हणजे राजकारणातल्या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीने. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांच्या भेटीने. जेव्हापासून या भेटीची माहिती समोर आली, तेव्हापासून पुन्हा जोरदार राजकीय चर्चा सुरू झाल्या. राज्याच्या राजकारणातला महोल गरमागरमीचा असताना या दोन्ही नेत्यांच्या भेटीत काय चर्चा झाली. याची उत्सुकता सर्वांनाच लागली. या भेटीबाबच अजित पवारांना विचारले असता, त्यांनी या भेटीचे संभाव्य कारण सांगितले आहे.
या भेटीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, बारा आमदारांचे नियुक्तीसंदर्भात आम्ही साहेबांना बोललो होतो, त्यानुसार त्यांनी ही भेट घेतली असावी, अशी प्रतिक्रिया या भेटीवर अजित पवारांनी दिलीय. गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडलेला आहे. राज्यपालांकडून या बारा आमदारांच्या नियुक्तीला ब्रेक लागला आहे. याबाबत आधीही अनेकदा चर्चा आणि भेटी झाल्या आहेत. मात्र अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पवारांनी या आदारांच्या नियुक्तीबाबत थेट मोदींची भेट घेऊन चर्चा केली, असावी असे अजित पवार म्हणाले आहे.
शरद पवार किंवा भाजपकडून मात्र या भेटीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र अजित पवारांनी या भेटीबाबत महिती दिल्याने आता तरी बारा आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे का? आता तरी रखडलेल्या यादीला मंजुरी मिळणार का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटी याआधीही अनेकदा झाल्या आहेत. आता पुन्हा या बड्या नेत्यांच्या भेटीने काही राजकीय समीकरण बदलणार? की परिस्थिती जैसे थे राहणार, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राज्या महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आणि शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाल्यापासून केंद्र आणि राज्यात जणू पाचवीला पुजलेला संघर्ष निर्माण झाला आहे. या भेटीनंतर या संघर्षाची धार बोथट होणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.