पाकिस्तानातून आयात कधीच बंद, शरद पवारांना चुकीची माहिती : नाफेड
कांदा पाकिस्तानातून आयात होत असल्याची चुकीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अधिकाऱ्यांकडून मिळाली असावी, असं नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितलं.
नाशिक : देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या बाजार भावात वाढ (Onion latest rates) होत आहे. येणाऱ्या दिवसात यात आणखी भर (Onion latest rates) पडत कांद्याचे भाव वाढणार असल्याचे संकेत ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिले. शिवाय कांदा पाकिस्तानातून आयात होत असल्याची चुकीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अधिकाऱ्यांकडून मिळाली असावी, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यासह देशात कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याचे बाजार भाव हे होलसेल बाजाराबरोबर किरकोळ बाजारातही वाढत आहेत. विविध देशांसह पाकिस्तानातून कांदा आयात केला जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आणि शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. शरद पवारांनीही जोरदार टीका केली. मात्र त्यांना कोणीतरी अधिकाऱ्याने चुकीची माहिती दिल्याने ते असं बोलले, असा नानासाहेब पाटील यांनी सांगितलं.
मध्यंतरीच्या काळात पाकिस्तानला जो विशेष आयातीसाठी दर्जा (Most Favoured Nation status) दिला होता, तो काढून टाकल्याने तेथून कांदा आयात होऊच शकतच नाही. त्यामुळे पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची ही फक्त अफवा असल्याचं नानासाहेब पाटील म्हणाले. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला दिलेला विशेष दर्जा काढला होता. यानंतर पाकिस्तानमधून भारतात होणारी आयात जवळपास बंद झाली.
देशाला दररोज 50 हजार मेट्रिक टन कांदा हा खाण्यासाठी लागतो. त्यामुळे सत्तेत कोणीही असल्यास इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा आयात करू शकणार नसल्याचं सांगत, कांदा आयात करण्याची निविदा काढण्यात आली तरी कांद्याच्या बाजार भावावर कुठलाही परिणाम होणार नाही. येणाऱ्या दिवसात नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत अशीच कांद्याची होलसेल बाजारात भाव वाढ होणार आहे.
कांदा भाव वाढीतून शहरी भागातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने 50 हजार मेट्रिक टन खरेदी केलेल्या कांद्यातून आतापर्यंत 25 टक्के, म्हणजे साडे बारा हजार मेट्रिक टन कांदा हा शहरी भागात पाठवण्यात आला आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई अशा मेट्रो शहरातील ग्राहकांना दिलासा देण्यात आला.