राष्ट्रवादीचं घड्याळ कुणाच्या हाती? राजीनामानाट्य आणि शरद पवार यांची ‘ती’ खेळी, दादा गटाला पडणार भारी
पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी हुकूमशाही आणि मनमानी कारभार केला. त्यामुळेच आता अजित पवार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष असल्याचा दावा अजित पवार गटानं केलाय. पण, आपल्याला अध्यक्षपदात कोणताही रस नाही, असं म्हणणाऱ्या ४ महिन्यांपूर्वीचा अजित पवार यांचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
मुंबई : 8 ऑक्टोबर 2023 | शिवसेना कुणाची यावरुन ठाकरे आणि शिंदे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची? या मुद्दयानेही कोर्टाची पायरी चढलीय. मात्र, शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रकरणातला फरक काय आहे? कोणते मुद्दे कोर्टापुढे मांडण्याची तयारी शरद पवारांचा गट करतोय. राष्ट्रवादीतलं राजीनामानाट्य कुणावर भारी पडेल? अशा अनेक मुद्द्यावर राष्ट्रवादीचं घड्याळ कुणाच्या हाती जाईल, याचा फैसला होऊ शकतो. निवडणूक आयोगानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी कोर्टाचे दार ठोठावले. आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाबरोबरच सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होणार आहे. जयंत पाटील यांनी पक्षविरोधी कारवाईमुळे सत्तेत गेलेल्या 9 मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करा अशी याचिका दाखल केलीय. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. 30 जूनला म्हणजे बंडाच्या २ दिवस आधी अजित पवार पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांच्या गटानं निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं.
इकडे 3 जुलैला शरद पवार हेच आमचे पक्षाध्यक्ष आहेत असे अजित पवार म्हणाले. तर, 5 जुलैच्या पहिल्या सभेत अजित पवार गटाच्या नेत्यांनी भाषणात फक्त ‘पक्षप्रमुख’ शब्द वापरला कुणाचं नाव घेतलं नाही. यात सर्वात कळीचा मुद्दा ठरु शकतो तो म्हणजे राष्ट्रवादीतलं राजीनामानाट्य. त्यावेळचा घटनाक्रम शरद पवार गट कोर्टापुढे सादर करु शकतो. त्यामुळेच शरद पवारांना अजित पवारांच्या बंडाची कल्पना आधीच होती का, याचीही चर्चा होतेय.
2 मे ला शरद पवारांनी अचानक राजीनामा दिला. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राजीनामा मागे घ्यावा यासाठी एक समिती नेमली. त्या समितीमध्ये भुजबळ, तटकरे, प्रफुल्ल पटेल आदि नेते होते. प्रफुल्ल पटेल यांनीच बहुमतानं शरद पवार यांनीच राजीनामा मागे घ्यावा. अध्यक्षपदी कायम राहावं असा प्रस्ताव मांडला. तेच नेते आता अजित पवारांच्या गटात आहेत. राजीनामा, प्रस्ताव, त्याला अनुमोदन हे सारं कागदावर वाचून झालेलं आहे. हाच मुद्दा अजित दादा गटाला अडचणीत आणणारा ठरू शकतो.
दुसरा मुद्दा आहे म्हणजे राष्ट्रवादीची घटना. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर राष्ट्रवादीची घटना आहे. ही घटना काय सांगते? कोणतेही १० प्रतिनिधी अध्यक्ष पदासाठी एखाद्याचं नाव सुचवू शकतात. तसा प्रस्ताव 10 दिवसांच्या आत निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिला जावा. अध्यक्ष पदासाठी एकाहून जास्त नावं असतील तर माघारीसाठी ७ दिवस दिले जातील. जर एकच नाव शिल्लक राहिलं तर तीच व्यक्ती अध्यक्ष म्हणून घोषित होईल.
महत्वाची एक अट अशी आहे की, विद्यमान अध्यक्षाचा मृत्यू किंवा राजीनामा अशी आपत्कालीन स्थिती उद्भवली तर प्रक्रियेद्वारे अध्यक्ष निवडेपर्यंत सर्वात ज्येष्ठ सरचिटणीस हा तात्पुरता अध्यक्ष असेल. हे सारे मुद्दे, त्याच्या तांत्रिक बाबी, त्यावरचा दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि अखेरीस निर्णय होईल. पण, तूर्तास अजित पवारांची शिवसेना फुटीवेळची भूमिका आणि आत्ताची भूमिका. राजीनामा नाट्यावेळी अजित पवार गटाची भूमिका आणि आत्ताची भूमिका या मुद्दयावरुन शरद पवार यांचा गट अजित पवारांच्या गटाला घेरतोय हे नक्की.