Sharad Pawar : उद्धव ठाकरेंचा पुढचा प्रवास कसा असेल? शरद पवारांचं अवघ्या 3 शब्दांत उत्तर! काय म्हणाले?
उद्धव ठाकरे लोकांवर विश्वास टाकतात आणि पूर्ण जबाबदारी देतात, हा त्यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी आणि विधीमंडळाची संपूर्ण जबाबदारी शिंदे यांच्याकडे दिली होती. त्याचा कदाचित बंडखोरी हा परिणाम आहे की नाही मला माहीत नाही, असे शरद पवार म्हणाले.
मुंबई/पुणे : उद्या जेव्हा ठाकरे लोकांमध्ये जातील आणि लोकांना मत द्यायची संधी मिळेल, त्यावेळी चित्र बदललेले असेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस म्हणून शपथविधी झाल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले. उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) आणि शिवसेना पक्षासोबत आता कमी आमदार उरले आहेत. तर त्यांचे भवितव्य काय असेल, असे विचारले असता त्यांनी ठाकरेंना जनतेत अधिक मिसळण्याचेच अप्रत्यक्ष सांगितले आहे. तर बंडखोरीसारखे प्रकार लोक खपवून घेत नाहीत. त्यांना ते आवडत नाही, हे उदाहरणासह स्पष्टही केले. त्यासोबतच बंड होत असतात. मात्र शिवसेना (Shivsena) संपणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘संघटनेची जबाबदारी शिंदेंकडे होती’
उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, की उद्धव ठाकरे लोकांवर विश्वास टाकतात आणि पूर्ण जबाबदारी देतात, हा त्यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी आणि विधीमंडळाची संपूर्ण जबाबदारी शिंदे यांच्याकडे दिली होती. त्याचा कदाचित बंडखोरी हा परिणाम आहे की नाही मला माहीत नाही, असे ते म्हणाले.
‘शिवसेना संपुष्टात येणार नाही’
शिवसेना संपुष्टात आली नाही. येणार नाही. बंड होत असतात. या पूर्वी भुजबळांनी बंड केले होते. आमच्या पक्षात आले. काही झाले नाही. त्यानंतर निवडणुकीत एक सोडून भुजबळांसह सर्व पडले. त्यानंतर राणेंनी बंड केले. तेही पराभूत झाले. साधारण शिवसेनेत असे आज झाले नाही. ज्यांनी बंड केले, त्याबद्दल शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे संघटना अशी बंद पडत नसते, असे ते म्हणाले.
‘बंड केल्यावर काय होते?’
बंड केल्यानंतर काय होते, याचेही उदाहरण त्यांनी दिले. ते म्हणाले, की 1981मध्ये माझ्या नेतृत्वात 67 आमदार निवडून आले. सहा महिन्याने निवडणूक झाल्यावर मी सुट्टीला गेलो होतो. दहा दिवसाने परत आलो. त्यावेळी माझ्यासह सहा लोक राहिले. मी 67 आमदारांचा विरोधीपक्ष नेता होतो. मी पाच लोकांचा नेता राहिलो. माझे पदही गेले. पण त्यानंतर निवडणूक झाली. मला सोडून गेलेल्या सर्वांचा पराभव झाला आणि माझी टीम ७३ झाली, असे त्यांनी सांगितले.