जयंत पाटील यांना पहिल्यांदाच रडताना पाहिलं; शरद पवार यांनी तडकाफडकी ‘तो’ निर्णय जाहीर करताच काय घडलं?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत जणू भूकंप आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे. पवारांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांना तर बोलताना अश्रूच अनावर झाले. त्यांना बोलताही येईनासे झाले.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचे प्रकाशन झाले. शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राचा हा दुसरा भाग आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनावेली शरद पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासाला उजाळा दिला. राजकारणात कसे आलो? कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी काय? आजवर कोणत्या कोणत्या पदावर काम केलं याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे, अशी घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण सभागृहात शांतता पसरली.
बराच वेळ गप्प… डोळ्यातून अश्रू
सर्वच नेते आणि कार्यकर्ते सभागृहात उभे राहिले. सर्वांनी साहेब निर्णय मागे घ्या… निर्णय मागे घ्या… अशा घोषणा सुरू केल्या. नंतर कार्यकर्ते नेते शरद पवार यांच्या भोवती गोळा झाले. जयंत पाटीलही शरद पवार यांच्या बाजूलाच बसले. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. अजितदादाही बोलले. अनेकांनी तीच मागणी केली. त्यानंतर जयंत पाटील बोलायला लागले. पण त्यांना लगेच रडू फुटले. त्यांना बोलता येईना. जागेवरून उभे राहिले तर ते उभे राहू शकले नाहीत. पुन्हा खाली बसले. हातात माईक घेतला. बराचवेळ गप्प होते. डोळ्यातून अश्रू येत होते. डोळे पुसत होते…
सर्वांचे राजीनामा घ्या
त्यानंतर मनाचा हिय्या करून जयंत पाटील बोलू लागले. पुन्हा हुंदका दाटून आला. त्याच रडवेल्या आवाजात त्यांनी साहेब निर्णय मागे घ्या. तुम्हाला जी भाकरी फिरवायची ती फिरवा. मीही काही बोलणार नाही. आम्ही सर्व राजीनामे देतो. आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या. पण तुम्ही पक्षाच्या अध्यक्षपदावरून जाऊ नका. अध्यक्षपदी कायम राहा, असा आग्रह धरत जयंत पाटील थांबले. तेव्हाही त्यांचा चेहरा पडलेला होता. अश्रू थांबत नव्हते.