सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार?, सरस कोण?; शरद पवार यांची बहीण काय म्हणाली ?
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा या एकाच घरातील दोन उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर येणार आहेत. त्यांच्यापैकी बारामतीमध्ये कोण विजयी होईल ? असा सवाल शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांना विचारण्यात आला.
कोल्हापूर | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकाची जय्यत तयारी सध्या सुरू असून सर्वच पक्षांचे राजकारण वेगात आहे. बारामतीमध्ये सुद्धा निवडणुकांचा माहोल चांगलाच रंगाल असून तिथे सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, तर सुप्रिया सुळेंना या लढाईचा आधीपासूनच अनुभव आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा या एकाच घरातील दोन उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर येणार आहेत. त्यांच्यापैकी बारामतीमध्ये कोण विजयी होईल ? असा सवाल शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यांचं स्पष्ट मत मांडलं.
काय म्हणाल्या सरोज पाटील ?
वैयक्तिकरित्या सांगायचं तर माझं सुप्रिया आणि सुनेत्रा या दोघींवरही खूप प्रेम आहे. सुनेत्रा या देखील खूप गोड आहेत. पण सुप्रिया यांचा तर प्रश्नच नाही. मला तिच्याबद्दल अतिशय अचंबा वाटतो. ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली. कधी एसटीत देखील बसली नाही. आम्ही तिला फुलासारखं जपलं, लाडक्या भावाची मुलगी म्हणून तिचे खूप लाड केले. ती इंग्रजी मीडियममध्ये शिकलेली. पण तिने स्वतःमध्ये प्रचंड बदल केला , असं सरोज पाटील म्हणाल्या.
बाप से बेटी सवाई
तिने जो तिचा कायापलाट केलाय त्याला तोड नाही. आम्हालसु्द्धा कोणाला एवढं व्यवस्थित, मुद्देसूद बोलता येणार नाही. लोकसभेतही, संसदेत ती अतिशय उत्तम बोलते, भाषण करते.विरोधी पक्षातील सगळे नेतेही तिचं भाषण लक्षपूर्वक ऐकत असतात. तिला पाहून ‘बाप से बेटी सवाई’ असं मला म्हणावं वाटतं, अशा शब्दांत सरोज पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचं कौतुक केलं.
सुप्रिया हिचा अभ्यास प्रचंड आहे, ती खूप फिरते. सुनेत्रा पवार हीदेखील स्वभावाने अतिशय गुणी आहे. कुटूंबात चांगल्या पद्धतीने मिसळली आहे. पण तिचा अभ्यास कमी पडणार. ते लोकांनी जाणलं तर सुप्रियाला मतं देणार. अभ्यासू नेता लोकसभेत पाठवायचं असेल तर शहाणी लोकं सुप्रियाला निवडून देतील, असं सरोज पाटील म्हणाल्या.
हा भाजपचा डाव
”पवार कुटुंबात राजकारण्यांनी घडवलेल्या फुटीबाबत प्रचंड वाटत आहे. दु:खही खूप वाटत आहे. भाजपचा रोख सर्व शरद पवार यांच्यावर आहे. शरद पवार यांना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपकडे खूप पैसा आहे. त्या जोरावर ते काहीही करु शकतात. अजित यांचा तोल थोडा सुटला असणार…पण त्यालाही दु:ख झाले असले. अजित चुकाला आहे की नाही, मला कळत नाही. परंतु शरद संदर्भात त्यांच्या तोंडातून जी भाषा आली, ते बोलण्याच्या ओघात आली असले. त्यांच्या मनात तसे काहीच नसेल. त्याला लहानपणापासून मी ओळखतो. तो संवेदनशील आहे. त्याला पश्चाताप अन् दु:खही झाले असेल ” अशी प्रतिक्रिया सरोज पाटील यांनी दिली.