शरद पवार आज रात्री अमित शाह यांना भेटणार, कारण काय?; दिल्लीत मोठ्या घडामोडी?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज रात्री या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्यात बंदी यामुळे कांदा आणि साखर उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. त्याच बरोबर ओबीसी नेतेही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे कांदा आणि साखरेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अवकाळी परिस्थितीमुळे शेतकरी खचला आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, शरद पवार अचानक शाह यांना भेटणार असल्याने या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतरची पवार-शाह यांची ही भेट असल्याने त्यावर तर्कवितर्कही वर्तवले जात आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज रात्री उशिरा अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राजेश टोपेही असणार आहेत. कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्यात बंदी यामुळे कांदा आणि साखर उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्यात बंदी उठवण्याची शरद पवार मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
निकालानंतरची भेट
या भेटीत देशातील विविध समस्यांवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय या भेटीत राजकीय चर्चा होऊ शकते, असंही म्हटलं जातंय. पण ही राजकीय चर्चा काय असेल हे गुलदस्त्यात आहे. या भेटीनंतर शरद पवार हे मीडियाशी संवाद साधण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अमित शाह यांची भेट होणार आहे. त्यामुळेही या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दिल्लीच्या वर्तुळाचं लक्ष
राष्ट्रवादीच्या ताब्याचा प्रश्न निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. निवडणूक आयोगात त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळेही ही भेट महत्त्वाची ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार आणि अमित शाह हे भेटत असल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळाचंही या भेटीकडे लक्ष लागलं आहे. पवार यांच्यासोबत राजेश टोपे असतील. आणखी कोण असणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.