शिवसेनेने केलेली मदत अमित शाह विसरले का ? संजय राऊत स्पष्टच बोलले
आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. शिवसेनेने अमित शहांना जी मदत केली ते त्याबद्दल विसरले का असा सवाल विचारण्यात आला असता राऊत स्पष्टच बोलले.
रविवारी शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पार पडलेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना टार्गेट करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. काल मविआचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अमित शाहांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यांनी इतिहासातील अनेक गोष्टींचा उल्लेख करत अमित शाहांचा तडीपारच्या वेळची परिस्थितीही सांगितली. ते जेव्हा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली असे पवार यांनी अमित शहांबद्दल सांगितलं होते. याच मुद्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. शिवसेनेने अमित शहांना जी मदत केली ते त्याबद्दल विसरले का असा सवाल विचारण्यात आला असता राऊत स्पष्टच बोलले.
शिवसेनेने, माननीय बाळासाहेब ठाकरेंनी फक्त अमित शाहांना नव्हे तर नरेंद्र मोदींनाही मदत केली होती. गुजरातच्या मुद्यावरून अख्खा देश जेव्हा मोदींच्या विरोधात होता, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून काढण्याची निर्णय पूर्णणे घेतला असताना, फक्त या देशामध्ये मा. बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते असे होते, जे नरेंद्र मोदींच्या बाजूने ठामपणे उभे होते, त्यांना आता काढणं योग्य नाही, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. असं अमित शहांच्या बाबतीतही काहीतरी घडलं असेल, त्याशिवाय शरद पवार काही बोलणार नाहीत,असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवार साहेबांनी एक माहिती दिली, आणि ते जो प्रसंग सांगत आहेत, अमित शाह हे त्यावेळेचे गुजरात दंगलीचे बरखास्त गृहराज्य मंत्री होते. मी देखील त्यांना अनेक वेळा अरुण जेटली यांच्या संसदेच्या कार्यालयाबाहेर बसलेले बघितले, ज्यांनी मदत केली त्याच कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा काम यांनी केले. काही गोष्टी मला देखील माहीत आहेत पण मी गुप्तता बाळगणारा माणूस आहे, काही गोष्टी या सांगायच्या नसतात, असे राऊत म्हणाले.
धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकार घेणार का?
यावेळी संजय राऊत यांनी बीड हत्याप्रकरणावरून बोलताना धनंजय मुंडेंचा राजीनामा हे सरकार घेणार का? असाही सवाल उपस्थित केला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड आणि खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान संजय राऊत यांनी वाल्मिक कराड प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. परळीमध्ये वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आंदोलन झालं, त्यावर सरकार शांत का बसलं आहे? लोकांचा आक्षेप आकाच्या आकावर आहे म्हणजेच धनंजय मुंडेंवर आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत सरकार दाखवेल का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
काय म्हणाले होते अमित शाह ?
शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात अमित शाहांनी शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. तर अजित पवार यांचीच राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी आहे. घरणेशाहीला थोबाडीत मारत तुम्ही सिद्धांताचे राजकारण चालतं हे दाखवून दिलं, मी शरद पवारांना सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रात 19, कोकणात 16, पश्चिम महाराष्ट्रात 24 जागा आम्ही जिंकल्या आहेत. धोका देण्याची सुरुवात शरद पवारांनी तर शेवट उद्धव ठाकरेंनी केला, असे टीकास्त्र अमित शाह यांनी सोडलं होतं. 1978 मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी करुन विश्वासघात करण्याचे जे राजकारण केलं, त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवण्याचं काम केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये आमच्यासोबत द्रोह केला. त्यांनी विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. त्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचे काम तुम्ही केलं, असंही अमति शाह म्हणाले होते.