मुंबई : पदवीधर आणि शिक्षक अशा 5 मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (MLC Election) जागा वाटपांची घोषणा झालीय. महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांनी जागा वाटून घेतल्या आणि प्रचारही सुरु केला. पण भाजप (BJP) आणि शिंदे गटातून (Shinde Group), तूर्तास तरी शिंदे गटाच्या वाट्याला एकही जागा येताना दिसत नाहीय. सर्व ठिकाणी भाजप लढताना दिसतेय. कोकण शिक्षक मतदारसंघांतून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघामधून अपक्ष ना गो गाणार मैदानात आहेत. पण त्यांना भाजपनं पाठींबा दिलाय. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून भाजपचे किरण पाटील, अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपनं पुन्हा एकदा रणजीत पाटलांना संधी दिलीय. तर नाशिकमधून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही.
नाशिकमधूनही भाजप आपलाच उमेदवार देण्याची अधिक शक्यता आहे आणि शिंदे गट उमेदवारीवरुन उघडपणे बोलण्यास तयार नाही. तर महाविकास आघाडीतून 5 पैकी काँग्रेस 2 जागा, ठाकरे गट 1, राष्ट्रवादी 1 आणि शेकाप 1 जागा लढवणार आहे.
नागपूरची शिक्षकची जागा ठाकरे गटाला देण्यात आलीय. ठाकरे गटातून गंगाधर नागाडे उमेदवार आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंना उमेदवारी मिळालीय. कोकण शिक्षक मतदार संघातून शेकापचे बाळाराम पाटील मैदानात आहेत.
अमरावती पदवीधरमधून धीरज लिंगाडेंना काँग्रेसकडून उमेदवारी मिळालीय. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागाही काँग्रेसच लढणार असून सुधीर तांबेंना उमेदवारी मिळालीय.
12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर फडणवीस आणि अजित पवारांनी प्रचारही सुरु केलाय. फडणवीसांनी अमरावतीतून तर अजित पवारांनी औरंगाबादेतून प्रचार सुरु केला.
शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणूकही तितकीच महत्वाची आहे. कारण त्यामुळं विधान परिषदेत त्या त्या पक्षाच्या आमदारांची संख्या वाढणार आहे. पण या निवडणुकीत शिंदे गटाला तूर्तास तरी काहीही मिळताना दिसत नाहीय.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. “अमरावती, नाशिक येथे काँग्रेस, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, नागपुरात शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलाय. अमरावती आणि इतर मतदारसंघात अर्ज दाखल केले जातील. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आलाय”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
“नागपूरच्या जागेसाठी एकमताने निर्णय झालाय. शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. इतर कुणी अर्ज भरलाय त्यांच्याशी चर्चा केली जाईल. या निवडणुकीला एकमताने जाण्याचे काम केलं जाईल. आमचं सर्वांचं एकमत झालंय”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.