जन्माला एकही मुलगी आली नाही, पण दाम्पत्त्याने केलं हजारो मुलींचं कन्यादान, शिर्डीतील दाम्पत्याचा कौतुकास्पद उपक्रम
स्वतःला मुलगी जरी नसली तरी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून सुमीत्रा कोते 2 हजार मुलींची आई झाल्या आहेत. सुमीत्रा कोते स्वतः लग्नाची सर्व तयारी करतात. दोन महिने अगोदरच त्यांची लगबग सुरू होते.

शिर्डी : खरंतर समाजात मुलगी जन्माला यायला हवी की नको याबाबत आजही मतप्रवाह आहे. मात्र, मुलगी जन्मला यावी आणि तीचं कन्यादान करण्याची संधी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. अशीच संधी शिर्डीतील एका दाम्पत्याची होती. मात्र, घरात मुलगी जन्माला आली नाही. त्यामुळे दाम्पत्याने एक सामाजिक उपक्रमच हाती घेतला आहे. स्वतःला मुलगी नसताना शिर्डीतील एका दाम्पत्याने आत्तापर्यंत 2 हजाराहून अधिक मुलींचे कन्यादान केले आहे. गेल्या 23 वर्षापासून दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत अनेक सर्व सामान्य कुटूंबाला मोलाचा आधार त्यांनी दिला आहे.
अवघ्या एक रुपयात विवाह संपन्न होत असल्याने साईंच्या पुण्यनगरीत यावर्षी 65 जोडप्यांनी आपल्या आयुष्याची लग्नगाठ बांधत आहे. विशेष म्हणजे विदर्भातील 41 जोडप्यांनी या विवाह सोहळ्याचा लाभ घेतला असून या शाही विवाहाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.
शिर्डीतील कैलासबापू कोते यांनी आपल्याला मुलगी नसली तरी आत्तापर्यन्त दोन हजाराहून अधिक मुलींचे कन्यादान केले आहे. त्यामध्ये सामूहिक शाही विवाह सोहळा आणि तो देखील एक रुपयांत करत असल्याने या विवाह सोहळ्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे.




एखाद्या मुलीच्या बापाला आपल्या मुलीचे लग्न करायचे कसे ? हि चिंता भेडसावत असते. मात्र, शिर्डीतील कैलासबापू कोते यांनी अशा सर्व लोकांना मोलाचा आधार दिला आहे. एक दोन नव्हे तर गेल्या 23 वर्षापासून आत्तापर्यंत 2000 मुलींचं स्वखर्चाने शाही थाटामाटात त्यांनी कन्यादान केल आहे.
दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन कैलासबापू कोते करत असतात. आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतीषबाजी, मुलीला सगळा साजश्रृंगार, संसाराला लागणारी सर्व भांडी, सोन्याच्या मंगळसुत्रासह सगळा थाटमाट हे दाम्पत्य करत असतात.
स्वतःला मुलगी जरी नसली तरी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून सुमीत्रा कोते 2 हजार मुलींची आई झाल्या आहेत. सुमीत्रा कोते स्वतः लग्नाची सर्व तयारी करतात. दोन महिने अगोदरच त्यांची लगबग सुरू होते.
मुलींच्या साड्या, साज श्रृंगार, संसारोपयोगी साहित्य स्वतः खरेदी करतात. अगदी आपल्या मुलीचे लग्न असल्यासारखी त्यांची धावपळ सुरू असते. कोणत्याही मुलीच्या बापाला आपल्या मुलीचे लग्न म्हणजे ओझे वाटू नये यासाठी आम्ही दरवर्षी हा सोहळा आयोजित केला जातो.
यंदाच्या वर्षी 21 बौद्ध आणि 44 हिंदू असे एकुण 65 विवाह या ठिकाणी पार पडलेत. कैलासबापू कोते यांनी सुरू केलेल्या या सामाजिक कार्यात शिर्डीचे ग्रामस्थही मोठ्या हिरारीने सहभागी होतात. साई सिद्धी चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे.
ज्यांचा विवाह इथे पार पडला त्यांच्या अपेक्षेपेक्षा छान आयोजन केल्याने नवरी नवरदेवही अगदी आनंदात असतात. विवाहावर होणारा अनाठायी खर्च करण्यापेक्षा आपल्या संसाराला, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करणे गरजेचे असून समाजात जर असे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू झाले तर कोणताही बाप मुलीच्या लग्नाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करणार नाही अशा भावना नवरी नवरदेवावे व्यक्त केल्या आहेत.