बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि १,१११ रुपये मिळवा, कोणाचे अनोखं आवाहन
कोल्हापूरात हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात मोठे आंदोलन केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. अशा प्रकाराची आंदोलने आता राज्यात ठिकठिकाणी केली जाणार आहेत

गेल्या काही दिवसात भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाराही बांग्लादेशी नागरिक असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे. उल्हासनगर शहरात आतापर्यंत १२ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांनी उल्हासनगर शहरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास १ हजार १११ रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.. तसंच कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे कामावर ठेवण्याआधी त्याची नीट चौकशी करा असेही आवाहन व्यापाऱ्यांना बॅनरच्या माध्यमातून त्यांनी केले आहे.
नेरूळ पोलीस ॲक्शन मोडवर
नवीमुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नव्या इमारतींच्या बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजूरांच्या कागदपत्रांची छाननी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नेरूळमधील एका इमारतीत बांधकाम करणाऱ्या कामगारांची चौकशी सुरू असून आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. हे सहा जण संशयित बांगलादेशी नागरिक असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे नेरुळ पोलिसांचे म्हणणे आहे. बांगलादेशी नागरिकांविरोधात नेरुळ पोलीसांनी आपली मोहिम वेगाने सुरु केली आहे.
नाशिकच्या मालेगावातील उशीला जन्म नोंदणी प्रमाणपत्र मिळविणाऱ्या २ लाख १४ हजार ३०७ अर्जांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे अशी मागणी भाजपाचे माजी खासदारकिरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. उशिरा जन्म नोंदणी अर्ज करणारे हे बांगलादेशी तसेच रोहींग्या असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. या प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे बनावट, खोटे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. याची चौकशी केली तर ९० टक्के जन्म नोंदणी प्रमाणपत्र अर्ज हे रद्द होतील असाही दावा सोमय्या यांनी केला आहे.




कोल्हापूरात हिंदूत्ववादी संघटनांचे आंदोलन
महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झाल्याने राज्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोध मोहीम राबवा आणि घुसखोरांना सहाय्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले आहे. कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदू राष्ट्र जागृती संघटनेने केलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. तर आंदोलकांच्या हातातील बांगलादेशीच्या विरोधातील फलक लक्षवेधी होते. विशेष म्हणजे यावेळी घंटानाद आंदोलन करून राज्यभर अशाच पद्धतीचे आंदोलन केले जाणार असल्याचे हिंदुराष्ट्र जागृती आंदोलन समन्वयक शिवानंद स्वामी यांनी म्हटले आहे.