शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपद, पण शपथ कोण घेणार? निमंत्रण पत्रिकेत उल्लेखच नाही; सस्पेन्स अजूनही कायम
Devendra Fadnavis Maharashtra CM Swearing-in Ceremony in Azad Maidan : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही?, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर सस्पेन्स वाढला आहे. शपथविधीला अवघे काही तास उरलेले असताना अद्याप स्पष्टता नाही.
महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काही तास शिल्लक आहेत. अशात नक्की कोण- कोण पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार, हे स्पष्ट झालेलं नाही. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत. पण उपमुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. आजच्या शपथविधी सोहळ्याची भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. या तीनही निमंत्रण पत्रिकांवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख आहे. तर शिंदे गटाच्या निमंत्रण पत्रिकेवर उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे.
शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेने सस्पेन्स वाढला
शिवसेना शिंदे गटाकडून आजच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे. पण या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार असा उल्लेख नसल्याने सस्पेन्स कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रिकेत अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचा उल्लेख आहे. मात्र शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेमुळे सस्पेन्स आणखी वाढला आहे.
उदय सामंत काय म्हणाले?
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या तासाभरात याबद्दलची स्पष्टता येईल. पुढच्या एक तासात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आधी मुख्यमंत्रिपदावर दावा केला. मात्र भाजपच्या 132 जागा निवडून आल्याने भाजपने मुख्यमंत्रिपद स्वत:कडे ठेवलं. मग एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदावर दावा सांगितला. जर उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये सहभागी व्हायचं असेल तर गृहखातं शिवसेनेला देण्यात यावं, असं शिंदेंनी भाजपला सांगितलं आहे. पण गृहमंत्रिपदाबाबत अद्यापर्यंत खल सुरु आहे. शपथविधीला काही तास शिल्लक आहेत, असं असताना अजूनपर्यंत याबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.