शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. त्यामुळे राजन साळवीसारखे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. हे शिवसैनिक आणि पदाधिकारी पक्ष सोडून का जात आहे? त्याचे कारण शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. दानवे म्हणाले की, समोरच्या लोकांनी बाजार मांडला आहे. पैशांची ऑफर दिली जाते. कामांची ऑफर दिली जात आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार केला जात आहे. या सगळ्या लोकांनी मांडला आहे. बाजारात मांडलेले लोक जात असतील तर याचा आम्हाला अजिबात दुःख नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अंबादास दानवे यांनीवर जोरदार टीका केली.हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला, असे कोकाटे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना अंबादास दानवे म्हणाले, कृषिमंत्री भिकाऱ्यांची उपमा शेतकऱ्यांना देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणतो, त्यांच्याबाबत ही भाषा शोभणारी नाही. शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा देवून सरकार उपकार करत नाही. याच शेतकऱ्यांच्या बळावर त्यांचे राज्य चालले आहे. या सरकारने शेतकऱ्यांचा अनेक अनुदान योजना थांबवल्या आहेत, असे दानवे यांनी म्हटले.
ऑपरेशन टायगर थांबणार नाही असे योगेश कदम म्हणाले होते, त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, योगेश कदम यांना काही माहीत नाही. ते अजून लहान आहेत. त्यांना अजून संघटनाही माहीत नाही. बापाच्या बळावर काम करणे सोपे असते. पण संघटना उभी करणे अवघड असते. या प्रकारच्या घोषणा आणि वल्गना करणारे खूप आले आणि गेले आहेत. उद्धव साहेबांचे नेतृत्वात शिवसेना तळपत्या तलवारीसारखी येत्या काळात उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस सहपत्नीक कुंभमेळा जाणार आहेत, त्याबाबत उपरोधिक टीका अंबादास दानवे यांनी केली. ते म्हणाले, ते कुंभमेळ्यास जाणार याचा अर्थ बरेच पाप त्यांनी केलेले असतील. ते धुवायला चालले असतील. त्याच्यावर काय बोलावे, असा टोला अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
बीडमधील गुंडागर्दी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही. सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची अशी दिसत नाही. सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची आहे. त्यांना बीडचा बिहार करायचा आहे.धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच इथली गुंडागर्दी संपेल, असे दानवे यांनी म्हटले.