‘जर अजितदादांना सोबत घेतलं नसतं तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या’; गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले
गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावेळी जर अजित पवार यांना सोबत घेतलं नसतं तर शिवसेनेला 125 जागा मिळाल्या असत्या आणि आमच्याही शंभर जागा निवडून आल्या असत्या, असं त्यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणूक निकालामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 230 जागांवर महायुतीचा विजय झाला. त्यामध्ये भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 57 जागांवर विजयी झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. दरम्यान या निकालावर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावेळी जर अजित पवार यांना सोबत घेतलं नसतं तर शिवसेनेला 125 जागा मिळाल्या असत्या आणि आमच्याही शंभर जागा निवडून आल्या असत्या असा दावा गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
अजित पवार यांना सोबत घेतलं त्यावेळी आम्ही विरोध केला नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो होतो. मात्र तरीही त्यावेली अजित पवार यांना सोबत घेतलं गेलं. पण आम्ही विरोध केला नाही. त्यावेळी त्यांना सोबत घेतलं नसतं तर शिवसेनेलाही सव्वाशे जागा मिळाल्या असत्या. आमच्याही शंभर जागा निवडून आल्या असत्या. शेवटी केंद्राच्या फायद्यासाठी जे सुरू होतं त्यासाठी आम्ही भाजपला मदत केली. केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे, यासाठी आम्ही कुठलीही आडकाठी आणली नाही, सर्व गोष्टींमध्ये तडजोड केली, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान श्रीकांत शिंदे हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे, यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकी काय चर्चा सुरू आहे? तो निर्णय आमच्या हातातला नाही. महायुतीची बैठक होईल त्यात त्याबाबाबत निर्णय होईल. एकनाथ शिंदे यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना ही केवळ चर्चाच असल्याचं म्हटलं आहे.