महायुतीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…

| Updated on: Dec 10, 2024 | 4:03 PM

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...
उदय सामंत
Follow us on

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान आता मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार आणि इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर आता शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना अजूनही गृहमंत्रिपदाबाबत आग्रही आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत देखील त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरी मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. मीडियामधून चर्चा आहे की येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असं मी ऐकतो आहे. 14 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत.  कोणाला कोणतं खातं मिळेल? हे येत्या दोन दिवसांत तुम्हाला कळेल तोपर्यंत तुम्ही सस्पेन्स ठेवा. रोज सकाळी मीडियावाले सांगतात, आम्हाला गृह खातं पाहिजे, पण अशा कुठल्याही खात्यासाठी चर्चा अडलेली नाही.सन्मानपूर्वक मंत्रिपदाचे वाटप होईल, असं सामतं यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता  आहे, असं म्हटलं होतं. यावर देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममतादीदींकडे नेतृत्व गेलं पाहिजे असं शरद पवार साहेब म्हणाले होते, हा खरा काँग्रेसचा अपमान आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका यशस्वी होत नाहीत, हा ठपका नेत्यांनी ठेवला आहे. हा काँग्रेसचा झालेला अपमान आहे त्यामुळे आम्ही या संदर्भात काय बोलणार?  राहुल गांधी यांचे नेतृत्व काढून ते आता जर ममता बॅनर्जी यांच्याकडे येणार असेल तर राहुल गांधी यांचं नेतृत्व कमकुवत आहे, असं महाविकास आघाडी दाखवत आहे, अशी प्रतिक्रिया सामतं यांनी दिली आहे.