‘घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो, म्हणजे किती…,’ काय म्हणाले विजय शिवतारे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत, ते स्वतः वकील असून त्यांना कायद्याचा अभ्यास आहे. गृहमंत्री कडक माणूस आहे, त्यांच्या टप्प्यात आला की ते कार्यक्रम करतात आणि बीड प्रकरणात दिलेला शब्द ते पाळतील असेही शिवसेना नेते आमदार विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या प्रकरणात एक महिन्यांनंतर आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर मात्र मोक्का कायदा लावण्यात आलेला नाही. त्यावरुन विरोधकांना सरकारला घेरले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभरात आक्रोश मोर्चे सुरु आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी या ठिकाणी भेट दिली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरुन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्याने आश्चर्य व्यक्ता होत आहे.
आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने येथे आलो आहोत. मी येथील परिस्थिती जाणून घेतली आहे. अत्यंत वाईट आणि निर्घृण पद्धतीने ही हत्या झाली असून आतापर्यंत कोणत्याही सरपंचाची अशा प्रकारे हत्या झालेली नाही, हे गंभीर प्रकरण असून मुख्यमंत्री स्वत: चाणक्य आहेत आणि स्वत: वकील असल्याने त्यांना कायद्याचा अभ्यास आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळतील असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. अजितदादा यांचे नेतृत्व परखड आहे. परंतू जी गोष्ट महाराष्ट्राला चुकीची वाटते. वाल्मीक कराड याचं साम्राज्य आणि त्यातून निर्माण झालेली विषवल्ली यांचं त्यांना काहीच वाटत नाही याचे शल्य असल्याचेही विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.
मस्साजोग प्रकरणात ज्या गोष्टीसमोर आल्या आहेत त्या आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविणार आहोत. वेस्ट बंगालमध्ये 1967 साली अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. तोच बेस मला परळीत दिसून येत आहे. जे मी या ठिकाणी लोकांकडून ऐकले ते भयावह आहे. गुंडाला कोणतीही जात नाही, त्या साम्राज्यामागे तो लोकांना वापरून घेतो. काही लोक इथे येऊन ओबीसी लोकांवर अन्याय होतो असे बोलतात हे चुकीचे आहे. देशमुख यांच्या हत्याऱ्यांना फासावर लटकवणे आवश्यक आहे. वाल्मिक कराड सारखा घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो, त्यामुळे तो किती शातीर आहे हे समजतं असेही विजय शिवतारे यावेळी म्हणाले.
दादा काही पोलिस ऑफिसर नाहीत
परळी येथील या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका. मी दादांना आवाहन करतो. अख्खा महाराष्ट्र म्हणत आहे हे चुकीचं झालं आहे, त्यामुळे त्यांनी प्रखर भूमिका घ्यावी आणि चुकीचा पायंडा पाडू नये ही प्रामाणिक विनंती आहे. अजितदादा काही पोलीस ऑफिसर नाहीत. आपण धनंजय मुंडे यांच्या बाबत बोलणार नाही. पण ही विषवल्ली मोडण्याची भूमिका दादांनी घेतली पाहिजे. त्यांनी सर्वसामान्यांमध्ये जाऊन बोलावे मग त्यांना खरे वास्तव माहिती पडेल असेही विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.