आमदार अपात्रतेच्या निकालाला उरले अवघे काही तास; कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

| Updated on: Jan 10, 2024 | 8:26 AM

Shiv Sena MLA disqualification Results : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू; कधी येणार निकाल? कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार? कोण आहेत हे आमदार? वाचा सविस्तर...

आमदार अपात्रतेच्या निकालाला उरले अवघे काही तास; कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?
Follow us on

मुंबई | 09 जानेवारी 2024 : एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारलं. भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात गेलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात या प्रकरणाचा चेंडू आला. आता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल येणार आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. आज दुपारी चार वाजता या प्रकरणाचा निकाल लागेल. मात्र हे 16 आमदार नेमके कोण आहेत? पाहुयात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अपात्रतेची टांगती तलवार

राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील बंडाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे आतापर्यंत चार वेळा निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 89,300 मतांनी एकनाथ शिंदे विजयी झाले होते.

या आमदारांवरही अपात्रतेची कारवाई होणार?

राज्याचे कृषीमंत्री, छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड मतदारसंघाचे अब्दुल सत्तार यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. पाच वेळा पैठण मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे वरिष्ठ नेते संदीपान भुमरे यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

धाराशिवच्या भूम-परंडा मतदारसंघाचे आमदार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुंबईतील भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांच्यावर देखील अपात्रतेची टांगती तलवार आहे.

पारोळा, एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील, महाड भरत गोगावले यांच्यावरही अपात्रतेची कारवाई होऊ शकते. जळगावच्या चोपडा मतदारसंघाच्या आमदार लता सोनावणे यांचंही या 16 आमदारांच्या यादीत नाव आहे. मुंबईतील मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे.

अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर, सांगलीच्या खानापूरचे आमदार अनिल बाबर, सातारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे, बुलढाण्याचे आमदार संजय रायमुलकर, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर आमदार अपात्रतेची टांगती तलवार आहे.