मुंबई: हिंदुत्व आणि भोंग्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने (shivsena) मनसे (mns) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. सिंधू नदीपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला पितृभू आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू. मग तो कुठल्याही जाती, धर्माचा का असेना! वीर सावरकरांच्या संकल्पनेतले हिंदुत्व हे असे होते. त्यांनी अहिंसेचा तिरस्कार केला, पण त्यांची अहिंसा शौर्याची व मर्दाची होती. तसे हिंदुत्व आज कोठे दिसते आहे? मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’चे पठण करणे हे नवे हिंदुत्व (hindutva) काही जणांनी जन्मास घातले आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. अयोध्येत शिवसैनिक बाबरीचे घुमट पाडून राममंदिराची तयारी करत असताना ज्यांनी पळ काढला व जबाबदारी झटकली त्यांना आता फक्त हिंदुत्वाचे हे असे राजकारण करायचे आहे. वीर सावरकर व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व मर्दानगीचे होते आणि त्याच मर्दानगीने अखंड हिंदू राष्ट्राचा विचार पुढे नेता येईल. सरसंघचालकांना त्यांच्या अखंड हिंदू राष्ट्रात नक्की काय हवे आहे, यावर एखादे चिंतन शिबीर व्हायला हवेच आहे, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे, भाजपसह संघालाही कानपिचक्या दिल्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे चीन आणि पाकिस्तानने गिळलेला तिबेट, कश्मीरचा भूभाग सोडवून घ्यायला हवा. बांगलादेशही भारताचाच भाग होता. पुन्हा पुराण काळातल्या भारतवर्षात अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि श्रीलंकाही आपलाच प्रदेश होता. नेपाळ हे सीतामाईचे माहेर, तर प्रभू श्रीरामाने श्रीलंकेवर स्वारी करून तो देश जिंकला होता. आता हा सर्व भाग जिंकून पंधरा वर्षांत अखंड भारताचे स्वप्न साकार होणार असेल तर त्या विचारांचे व योद्ध्यांचे स्वागत करावेच लागेल. फक्त त्याआधी कश्मीर खोऱ्यात पंडितांची घरवापसी करावी लागेल व गलवान व्हॅलीत घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर काढावे लागेल. मग अखंड हिंदू राष्ट्राचा झेंडा फडकायला किती वेळ लागणार?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
संबंधित बातम्या:
पाच कारणं ज्याच्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूक महत्त्वाची आहे; वाचा ग्राऊंड रिपोर्ट
कसा आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ; आजवर कुठल्या पठ्ठ्यानं गाजवलं कोल्हापूर उत्तरचं मैदान?