एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेना ठाकरे गटाला राज्यात खिंडार
मोठी बातमी समोर येत आहे, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला असून, राज्याच्या विविध भागातील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवारी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ठाणे, भिवंडी, शहापूर, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आनंद आश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकच रस्ता पकडला तो म्हणजे शिवसेना, 60 आमदार निवडून आले, त्यामुळे खरी शिवसेना कोणाची यावर देखील आता जनतेनं शिक्कामोर्तब केलं आहे. आम्ही अनेक योजना आणल्या, त्यामुळे लाडक्या मातांनी, बहिणींनी आमच्यावर मतांचा वर्षाव केला. विरोधकांना चारी मुंड्या चित केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी 200 च्यावर आमदार जिंकून दाखवले, त्यांनी माझ्यावर आरोप केले, शिव्या श्राप दिले, पण मी त्यांना कामातून उत्तर दिलं. अनेक लोकांना स्वप्न पडली होती, हॉटेलचेही बुकिंग केले होते. मात्र ते रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली. विकास योजनांमध्ये खोडा घालणाऱ्यांना लोकांनी घरी बसवले.
आता मी डीसीएम आहे. महायुतीने जेवढे प्रकल्प आणले, जेवढ्या योजना आणल्या तेवढ्या इतिहासात कोणी आणल्या नाहीत. विश्वासाला तडा जाणार नाही, विधानसभेनंतर आता स्थानिक पातळीवर भगवा फडकवायचा आहे, इथे कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. पूर्वी काही लोक सहकऱ्यांना घरगडी समजायचे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी भाजपनं देखील पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का दिला. पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.