सातासमुद्रापार रशियात शिवजयंती साजरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतूक

| Updated on: Feb 20, 2023 | 7:31 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रशियामध्ये देखील साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विद्यार्थ्यांचे कोतूक केले.

Follow us on

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. मात्र हाच दिवस सातासमुद्रापार रशियामध्ये साजरा करणाऱ्या मराठी शिवप्रेमी तरुणांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

रशियामधील ओशत स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ७५० मराठी तरुण हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यंदा त्यांनी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या आयोजनाची मुख्यमंत्री महोदयांनी दखल घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीसीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला अन् त्यांची ही इच्छा पूर्ण झाली.

“आपण आपल्या मातृभूमीपासून लांब राहूनही शिवजयंतीचा सण साजरा करत आहात हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मी स्वतः देखील आग्र्यामधील लाल किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी जात असून स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे शिवजयंती साजरी केली जात आहे. मात्र तुम्ही सगळ्यांनी आपला अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी सांभाळून शिवजयंती साजरी करत आहात हे खरच फार मोठी गोष्ट असून तुम्हा सर्वांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो असे मुख्यमंत्र्यांनी या भावी डॉक्टरांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या संवादामुळे सातासमुद्रापार शिवप्रेम व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपला शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.