Shivneri Bus : नवीमुंबईकरांसाठी खुशखबर, वाशी ते स्वारगेट मार्गावर एसटीच्या शिवनेरी सुरू, काय आहेत वेळा ?
गेल्या आठवड्यात ठाणे ते पुणे ई-शिवनेरीच्या फेऱ्या सुरू केल्यानंतर आता नवीमुंबईकरांच्या सोयीसाठी वाशी ते पुणे ( स्वारगेट ) मार्गावर एसटी महामंडळाच्या शिवनेरीच्या फेऱ्या सोमवारपासून सुरु झाल्या आहेत.
मुंबई : नवीमुंबईतील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ( MSRTC ) आनंदाची बातमी आणली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतानाच एसटी महामंडळाच्या प्रतिष्ठीत शिवनेरी ( Shivneri Bus ) आता वाशी ते पुणे ( स्वारगेट ) या मार्गावर सोमवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. प्रायोगिक तत्वावर या फेऱ्या सुरू केलेल्या असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. अलीकडेच ठाणे ते पुणे मार्गावर सुरु केलेल्या ईलेक्ट्रीक शिवनेरीलाही ( Electric Shivneri ) चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नवी मुंबईत राहणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या पनवेल आगाराच्यावतीने सोमवार 8 मे पासून वाशी ते स्वारगेट मार्गावर दररोज वातानुकूलित शिवनेरी सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या शिवनेरी बसेस डीझेलवर धावणाऱ्या असून त्या विनावाहक असणार आहेत.
ठाणे ते पुणे ई-शिवनेरीचे 20 लाख उत्पन्न
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे ते पुणे ईलेक्ट्रीक शिवनेरीचे उद्धाटन करण्यात आले होते. ठाणे ते पुणे मार्गावर नुकत्याच 14 ई – शिवनेरी सुरू झाल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सात दिवसांत ठाणे ते पुणे मार्गावरील इलेक्ट्रीक शिवनेरीने 1,488 प्रवाशांच्याद्वारे एकूण 20 लाख 67 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
वाशी ? स्वारगेट ? वाशी मार्गावर, शिवनेरी बसच्या विशेष फेऱ्यांचे वेळापत्रक !#avaliyapravasi#अवलियाप्रवासी#msrtcofficial pic.twitter.com/ObSNLvePew
— Rohit Dhende (@avaliyapravasi) May 7, 2023
असे आहे वेळापत्रक
पहिली शिवनेरी सकाळी 6.15 वाजता वाशी येथून सुटणार आहे. तर स्वारगेट ( पुणे ) येथून सकाळी 10.15 वाजता उलट दिशेची परतीची शिवनेरी सुटेल. वाशी येथून दुसरी शिवनेरी सकाळी 7.15 वाजता सुटेल. तर स्वारगेट येथून उलट दिशेने परतीची फेरी सकाळी 11.45 वाजता सुटेल. वाशी येथून तिसरी शिवनेरी दुपारी 2.15 वाजता सुटेल तर उलट दिशेची तिसरी शिवनेरी स्वारगेट येथून सायंकाळी 6.45 वाजता सुटेल. वाशी चौथी आणि शेवटची शिवनेरी दुपारी 3.15 वाजता सुटेल तर उलट दिशेची शेवटची शिवनेरीची फेरी स्वारगेटहून सायंकाळी 7.45 वाजता सुटेल अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.