बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आमनेसामने येणार?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याकडे परंपरा पाळल्या जात नाहीत. महाराष्ट्रात सूड आणि बदला घेण्याचे राजकारण सुरू आहे. हे निश्चित आहे, अशी टीका केली होती. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई : विधान भवनातील सेंट्रल हॉल येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( BALASAHEB THACKAREY ) यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKAREY ) यांचे नाव छापण्यात आले नाही. यावरून शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यामागे एक राजकारण आहे. राज्यात बाप चोरणारी टोळी सक्रिय झालीय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असा टोला त्यांनी लगावला होता.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी येत्या सोमवारी २३ जानेवारी विधीमंडळातील मध्यवर्ती सभाग़हात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण भव्य समारंभात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सगळयांनाच निमंत्रण देण्यात आले आहे असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाने भाजसोबत सलोखा करत राज्यातील उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदाचे सिंहासन हिसकावून घेतले. शिंदे गटाने आपल्यासमोर यावे आणि आपल्या मागण्या सांगाव्यात असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु, गुवाहाटी गाठलेल्या शिंदे गटाने त्यांच्यासमोर येण्याचे टाळले होते. त्यांनतर विधिमंडळाच्या अधिवेशनातही सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांसमोर येण्याचे टाळले होते. त्यामुळे आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर येणार का? याचीच उत्सुकता आहे.