अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबियांशी संपर्क, पत्नीने दिली महत्त्वाची माहिती
पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापल्यावर ते सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाले होते. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहिम राबवली. ३६ तासांनंतर त्यांचा कुटुंबियांशी संपर्क झाला. सध्या ते विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
MLA Shrinivas Vanga Found : पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे श्रीनिवास वनगा नाराज झाले होते. त्यानंतर सोमवारी रात्रीपासूनच श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल झाले होते. त्यांचे दोन्ही फोन बंद असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. पण आता अखेर ३६ तासांनी श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे.
श्रीनिवास वनगा हे सोमवारी रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. गेल्या ३६ तासांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. आता अखेर ३६ तासांनंतर श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी संपर्क झाला आहे. ते रात्रीच्या वेळी घरी आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुमन वनगा यांनी दिली महत्त्वाची माहिती
श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांना श्रीनिवास वनगा कुठे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, याबद्दल विचारपूस करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली. “परवा रात्रीपासून पोलिसांनी खूप शोधाशोध केली. सर्वजण खूप काळजी करत होते. मुख्यमंत्र्यांनीही फोन केला होता. यानंतर ते (श्रीनिवास वनगा) रात्री घरी आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आराम करत आहेत. त्यांना आराम करायचा होता, त्यामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत. त्यांनी कुठे आहेत, याची काहीही माहिती दिली नाही. पण त्यांच्यासोबत काही जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी घरी कधी येणार याबद्दल काहीही सांगितलेलं नाही”, असे सुमन वनगा यांनी म्हटले.
नेमकं काय घडलं?
शिंदे गटाकडून सोमवारी संध्याकाळी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी शिंदे गटाकडून माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली. यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज झाले. राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्याशी चर्चा केली. पण उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर रडत आपली फसवणूक झाल्याचे म्हटले. ‘उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला’, असे श्रीनिवास वनगा म्हणाले.
यानंतर श्रीनिवास वनगा हे रात्रीच्या सुमारात घराबाहेर पडले. श्रीनिवास वनगा यांची पत्नी सुमन वनगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास वनगा हे काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घराबाहेर पडले. ते आपले दोन्हीही मोबाईल बंद करुन घरातून निघून गेले. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी एका पिशवीत काही कपडे भरले होते. ती पिशवी घेऊन श्रीनिवास वनगा हे घराबाहेर पडले. त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय हे कोणालाही सांगितलं नाही. तसेच त्यांचा फोनही बंद आहेत. आम्ही त्यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नाही. मी त्यांच्या मित्रांनाही फोन केला. त्यांच्याकडे विचारपूस केली. मी त्यांच्या ड्रायव्हर, बॉडीगार्डलाही विचारलं. रात्री अंधार होता, त्या अंधारात ते घराबाहेर पडले आणि पटापट चालत गेले, असे सुमन वनगा यांनी सांगितले.
घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
यानंतर श्रीनिवास वनगा यांचा पोलीस शोध घेत होते. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अनेक कार्यकर्तेही त्यांच्या घराबाहेर जमले होते. अखेर आता ३६ तासांनी श्रीनिवास वनगा यांनी कुटुंबाशी संपर्क साधला आहे.