एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण, राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…
"त्या खरं बोलल्या. काहीही खोटं बोलल्या नाहीत. आम्ही देना बँक आहोत आणि समोर लेना बँक आहेत, म्हणून ते जे बोलल्या ते कटू सत्य आहे", असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला. या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना अब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी नुकतंच मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण केली. त्यासोबतच त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. “नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढेल, त्यामुळे त्यांना मिरची लागली”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“हा एकनाथ शिंदे त्यांना पुरुन उरला होता”
“नीलम गोऱ्हे हे दिल्लीच्या व्यासपीठांवरुन एक वाक्य बोलल्या आता ते व्यासपीठ बरोबर होतं की चुकीचं होतं हा भाग वेगळा. परंतु ते काही जणांना एवढं झोंबलं की मिरच्या लागल्या. हा एकनाथ शिंदे त्यांना पुरुन उरला होता. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढेल, त्यामुळे त्यांना मिरची लागली. नीलम गोऱ्हेंच्या आधीही अनेक लोक हे बोलले आहेत”, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.
“त्यांचं पोट दुखत आहे”
“जेव्हा आम्ही उठाव केला, तेव्हाला रोज आम्हाला शिव्याशाप दिले. मी कधीही आरोपाला उत्तर दिलं नाही. मी कामातून उत्तर दिले. त्यामुळे महायुती सरकार लोकप्रिय ठरलं. जेव्हापासून यांची खुर्ची गेली, तेव्हापासून यांना मिरची लागली आहे. त्यांचं पोट दुखत आहे”, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
“काहीही खोटं बोलल्या नाहीत”
“त्यांना खोके नाही कंटेनर लागतात, असे राज ठाकरे बोलले होते. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे असे अनेकजण बोललेत. हे काही नवीन नाही. पण नीलम ताई बोलल्यानंतर त्यांच्या मागे इतके लागले, त्यांना इतक्या मिरच्या लागल्या, पण नीलम ताईंवर इतक्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं, आरोप करणं त्यांना शोभत नाही. त्या खरं बोलल्या. काहीही खोटं बोलल्या नाहीत. आम्ही देना बँक आहोत आणि समोर लेना बँक आहेत, म्हणून ते जे बोलल्या ते कटू सत्य आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
“तेव्हा नीलम ताई चांगल्या होत्या”
“नीलम गोऱ्हे या महिलेंवर अत्याचार झाला किंवा इतर काहीही झालं तर त्या पहिल्या धावून जायच्या, तेव्हा नीलम ताई चांगल्या होत्या. आताही शक्ती विधेयकात त्यांचे मोठं योगदान आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्या काम करतात. हीच पोटदु:खी आहे. ती पोट:दुखी थांबत नाही, कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाहीत, कंपांऊडरकडून औषध घेतात”, असा टोलाही शिंदेंनी लगावला.