शिवसेना प्रवेशासाठी मला आतापर्यंत 25 फोन आलेत : विजय वडेट्टीवार
काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी मला आतापर्यंत वांद्रेहून किमान 25 फोन आले आहेत, असा दावा वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी केलाय.
चंद्रपूर : एका विरोधी पक्ष नेत्याने भाजपात प्रवेश केला. तर दुसरा विरोधी पक्षनेता आपल्या गळाला लावण्यासाठी शिवसेनाही प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण, काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी मला आतापर्यंत वांद्रेहून किमान 25 फोन आले आहेत, असा दावा वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी केलाय.
चंद्रपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबाबत हा गौप्यस्फोट केला. शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत आहेत. एक विरोधी पक्ष नेता भाजपमध्ये गेला म्हणून दुसरा विरोधी पक्ष नेता शिवसेनेला त्यांच्या पक्षात न्यायचा आहे. मला वांद्रेहून आतापर्यंत 25 फोन आले आहेत आणि भेटायला बोलावत आहे, असं त्यांनी सांगितलं.
राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. पण लोकसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर राधाकृष्ण विखेही भाजपात गेले. विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पण शिवसेनेला विरोधी पक्ष नेताच पक्षात घ्यायचाय, असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, भाजपची स्थिती मजबूत असलेल्या विदर्भात पक्ष संघटनासाठी शिवसेनाही प्रयत्नशील आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचं कुटुंब शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि वरिष्ठ नेते मनोहर नाईक यांच्यासह त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक यांनी शिवसेना प्रवेशाची घोषणा केली आहे.