Breaking | शिंदे-भाजपात जागा वाटपावरून ठिणगी? गजानन कीर्तिकरांनी ठणकावलं, लोकसभेला आणि विधानसभेला ‘तोच’ फॉर्म्युला हवा!
आगामी निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती एकत्रित लढणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र जागावाटपासून दोन्ही पक्षात आतापासूनच ठिणग्या उडण्यास सुरुवात झाली आहे.
गोविंद ठाकूर, मुंबई : आगामी विधानसभा (Assembly) आणि लोकसभा (Loksabha) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शिंदे-भाजप युती तसेच महाविकास आघाडी परस्परांविरोधात रणनीती आखत आहेत. मात्र युती आणि आघाडी अंतर्गतच जागावाटपाचं गणित अत्यंत गुंतागुंतीचं असल्याचं दिसून येतंय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालंय खरं. पण शिंदेगट आणि भाजपामध्ये जागावाटपावरून प्रचंड घमासान होणार असल्याची चिन्ह दिसतायत. विशेषतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाल्याचं दिसून येतंय. बावनकुळे यांनी विधानसभेला शिंदे गटाला 50 जागा देण्यात येतील असं वक्तव्य केल्यानंतर आता गजानन कीर्तिकर यांनीही भाजपला चांगलंच सुनालंय. 2019 च्या फॉर्म्युल्यानुसारच जागावाटप हवं, असा इशारा त्यांनी दिलाय.
50 नाही, विधानसभेला 126 जागा
जागावाटपावरून प्रतिक्रिया देताना गजानन कीर्तिकर म्हणाले, शिवसेनेसाठी 50 नाही तर विधानसभेला 126 जागा सोडाव्या लागतील. लोकसभेला 22आणि विधानसभेला 126 जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. काही जागांची अदलाबदल होऊ शकते, पण सूत्र बदलता कामा नये, असा इशारा कीर्तिकर यांनी दिलाय.
‘शिंदेंची शिवसेना कमजोर नाही’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना काय कमजोर नाही, असं शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी भाजपला ठणकावून सांगितले. शिवसेना-भाजप यांनी २०१९ मध्ये युती करुन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या.
‘तोच फॉर्म्युला हवा….’
लोकसभेला भाजपने 26, तर शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. विधानसभेला आम्ही 126, तर भाजपने 162 जागांवर उमेदवार दिले होते. हा फॉर्म्युला कायम राहिला पाहिजे.
लोकसभेला 22 आणि विधानसभेला 126 जागा आमच्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. काही जागांची अदलाबदल होईल, पण आकडे बदलले जाणार नाहीत. एकनाथ शिंदेंची शिवसेना कमजोर नाही, असं गजानन कीर्तिकर म्हणाले..
भाजप तेव्हा सत्तेबाहेर होता…
तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप सत्तेबाहेर होता, हे गजानन कीर्तिकर यांनी आवर्जून दाखवून दिले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याने भाजप सत्तेत आल्याचं कीर्तिकर म्हणाले. जागावाटपात शिंदे यांच्या शिवसेनेची मागणी भाजप ऐकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ मला आशा आहे की भाजपही आमचे ऐकेल, कारण भाजप महाविकास आघाडीच्या वेळीही सत्तेबाहेर होता आणि एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले आणि चांगले काम करत आहेत.
घडले त्यास राहुल गांधी जबाबदार!
राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने बजावलेली शिक्षा आणि त्यानंतर लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई झाली. यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. गजानन कीर्तिकर यांनी यासाठी राहुल गांधींनाच जबाबदार धरलंय. ते म्हणाले, ‘ राहुल गांधींना कोर्टाने माफी मागण्यास सांगितले, पण त्यांनी माफी मागितली नाही.जे काही घडले त्याला राहुल गांधी स्वतः जबाबदार आहेत.