महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट, शिवसेना नेत्यांची स्पेशल डिमांड, म्हणाले “फडणवीसांप्रमाणेच आम्हालाही…”

| Updated on: Nov 30, 2024 | 11:46 AM

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या कोणत्याही बैठका होणार नाहीत. त्यामुळे राज्यातील जनतेला सत्तास्थापनेसाठी अजून वेट अँड वॉच करावं लागणार आहे. त्यातच आता शिवसेना नेत्यांकडून भाजपकडे अनोखी मागणी केली जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट, शिवसेना नेत्यांची स्पेशल डिमांड, म्हणाले फडणवीसांप्रमाणेच आम्हालाही...
एकनाथ शिंदे, नेते, शिवसेना
Image Credit source: Facebook
Follow us on

Eknath Shinde Deputy CM : महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल लागून एक आठवडा उलटला असला तरी अद्याप सरकार स्थापना झालेली नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही मुख्यमंत्री कोण याचा निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता सोमवारी २ डिसेंबरला राज्यातील सत्तास्थापनेचा निर्णय घेतला जाणार आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या कोणत्याही बैठका होणार नाहीत. त्यामुळे राज्यातील जनतेला सत्तास्थापनेसाठी अजून वेट अँड वॉच करावं लागणार आहे. त्यातच आता शिवसेना नेत्यांकडून भाजपकडे अनोखी मागणी केली जात आहे.

गृहमंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध

सध्या महाराष्ट्रात गृहमंत्रीपद कोणाकडे असणार यावरुन राजकारण सुरु आहे. त्यातच गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रात्री दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासह महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला. तर एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रि‍पदाची मागणी केली आहे. पण महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्या बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदासह केंद्रीय मंत्रि‍पदाची ऑफर देण्यात आली. या ऑफरवर शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री स्वीकारण्याची विनंती केली. पण आता यात मोठा ट्वीस्ट आला आहे.

भरत गोगावले काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपद मिळणार की नाही यावर सध्या राजकारण सुरु आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटातील एका नेत्याने याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं. त्याप्रमाणे आता एकनाथ शिंदेंना जर उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर त्यासोबत गृहमंत्रीपदही असावं, असं आता आम्हाला वाटतंय. मग त्यात चुकीचं काय? असा सवाल शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?

उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं की नाही हा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ते जो काही निर्णय घेतील, त्या निर्णयाशी आम्ही सर्व बांधील आहोत. मग तो निर्णय काही का असेना, असेही भरत गोगावले म्हणाले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरु असताना आता उदय सामंत यांनी यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे नाराज नाही. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते त्यांच्या गावी विश्रांतीसाठी गेले आहे. ते उपमुख्यमंत्री व्हावेत, अशा आम्ही त्यांना विनंती केली आहे. मात्र याबद्दलचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच करतील, असे उदय सामंत यांनी म्हटले.

5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी

दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी सध्या चांगला मुहूर्त नाही, येत्या २ तारखेपासून चांगले मुहूर्त आहेत, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. यामुळे २ डिसेंबरनंतर नव्या मुख्यमंत्र्‍याचा शपथविधी होऊ शकतो असे बोललं जात आहे.