शिवसेनेत मी नाराज पण राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्या तथ्यहीन : महेश कोठे
माझ्या विरुद्ध षडयंत्र सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार या केवळ अफवा आहेत, असा खुलासा शिवसेनाचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केला आहे.
सोलापूर : शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश या केवळ अफवा आहेत. यापूर्वी मी भाजपमध्ये जाणार म्हणून काही जणांकडून भांडवल करत माझं शिवसेनेचे तिकीट कट करण्याचा षडयंत्र रचलं गेलं होतं. त्याच पद्धतीचे षडयंत्र आता पुन्हा माझ्याबाबतीत रचले जात आहे, असा खुलासा कोठेंनी केला. मी शिवसेनेत नाराज जरूर आहे. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचं महेश कोठे यांनी स्पष्ट केले. (Mahesh Kothe denied news of joining NCP)
पुतण्या कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे मी कुटुंबीयांसोबत सध्या होम आयसोलेशन मध्ये आहे. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत केवळ अफवा असल्याचं महेश कोठे यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटलो नसून माझ्या संदर्भातल्या बातम्या आल्या आहेत, त्यामध्ये कसलेच तथ्य नसल्याचं कोठे यांनी सांगितलं आहे, मी शिवसेनेतून बाहेर जावे यासाठी काहीजण षडयंत्र करत स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचे नाव न घेता कोठे यांनी आरोप केला आहे. सध्या क्वारंटाईन असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याचे कोठे यांनी सांगितले.
महेश कोठे हे सध्या शिवसेनेत असून काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेले स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचे ते चिरंजीव आहेत. कोठे यांनी 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत सोलापुरातील शहर मध्य मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्याने शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करत शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
कोण आहेत महेश कोठे?
- महेश कोठे सध्या सोलापूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आहेत
- आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक
- सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेल्या विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव
- 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली.
- 2019 ला शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली.
- महेश कोठे यांना 21 नगरसेवकांपैकी शिवसेनेच्या 19 नगरसेवकांचा पाठिंबा
संबंधित बातम्या:
सोलापुरात राजकीय भूकंप होणार?, शिवसेनेच्या महेश कोठेंसह MIM चे तौफिक शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर
शिवसेनेने पाच बंडखोरांना हाकललं, तृप्ती सावंत-राजुल पटेलांचं काय?
(Mahesh Kothe denied news of joining NCP)