दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या विधानावरुन शिवसेना मंत्र्याचा युटर्न, म्हणाले “आता दोन्ही शिवसेना…”
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑपरेशन टायगर सुरु आहे. सध्या ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

Sanjay Shirsat On Shivsena alliances : राज्याच्या राजकारणात सध्या मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑपरेशन टायगर सुरु आहे. सध्या ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदेंच्या गटातील शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केले आहे. “मला संधी मिळाली तर मी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार”, असे संजय शिरसाट म्हणाले होते. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा भूकंप होणार का अशी चर्चा रंगली होती. आता यावरुन संजय शिरसाट यांनी युटर्न घेतला आहे.
संजय शिरसाट यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दोन्हीही शिवसेना एकत्र येण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले काल मी जे वक्तव्य केलं त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. शिवसेना फुटू नये या मताचे आम्ही होतो. मी प्रयत्न करतो असे समजण्याचा काहीच कारण नाही. मी कोणता विद्वान आहे त्यांना सांगायला. मी काही वेगळे प्रयत्न करेल असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. भविष्यात जे घडेल त्याचा आनंदच आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी बाहेर पडले नव्हते
“उद्धव ठाकरे यांना सत्तेचा मोह होता. सत्तेच्या मोहापायी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी राजा म्हणून राज्य करावे आणि आम्ही सेवक म्हणून कारभार केला असता. एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी बाहेर पडले नव्हते. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याचा राग होता. येणारी महापालिका निवडणूक झाल्यावर त्यांना (उद्धव ठाकरे) कळेल की खूप मोठी चूक झाली आहे. पण आता पुलाखालून पाणी फार वाहून गेले आहेत. आता दोन्ही शिवसेना एक येणे शक्य नाही”, असे संजय शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरेंचे कान भरण्यात आले
“ते एकत्र आले तर हरकत नाही. मात्र आता हे एकत्र येणार नाही. पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. अमित शहा यांना अफजल खान यांची उपमा, हे अनबॅलेंस झाले आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी हे एकत्र येणार नाहीत. आता अशी अवस्था आहे की काँग्रेस जी सत्तेत होती, त्यांचा साधा फोन देखील यांना नाही. यांना स्वतःच म्हणणारे आता कोणताही पक्ष नाही. उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले होते. आम्ही ८ ते १० जण नाराज आहे, त्यांना जाऊ द्या, मात्र जेव्हा उठाव झाला, तेव्हा कळाले की हे 40 जण होते”, असेही संजय शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना सुधारायला देणार नाही
“गेले 25 वर्षे युतीत सडले हे म्हणाले. मात्र अडीच वर्ष ज्यांच्या सोबत काढले त्यांनी किती त्रास दिला, हे सांगत नाही. त्यांच्याकडे एवढे रथी महारथी आहेत. त्यांच्याकडे विद्वानांची गँग आहे. ही उद्धव ठाकरे यांना सुधारायला देणार नाही. मी गंगाधर गाडे यांनी घेऊन मातोश्रीवर गेलो होतो. भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न केला होता. ते चांगल्या प्रकारे यशस्वी देखील झाले आहे”, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.