अरविंद सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट, ज्या कोर्टानं राहुल गांधींना शिक्षा सुनावली, तिथे काय घडलं? काय आहे Inside story?
अरविंद सावंत यांनी राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने ठोठवलेल्या शिक्षेवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुरुवारी सूरत (Surat) येथील सत्र न्यायालयाने मानहानी प्रकरणात 2 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. त्या सूरत सत्र न्यायालयात दोन दिवसांपूर्वी काय घडलं, यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईबाबत, त्यांच्या कोर्टातील खटल्याबाबत जेवढी तत्परता दाखवली, तेवढी तत्परता महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेच्या खटल्याबाबत का दाखवत नाहीत, असा सवाल अरविंद सावंत यांनी केलाय. देशभरात घडणाऱ्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात असून यासाठी एकजुटीने लढा द्यावा लागेल. यासाठी आम्ही काँग्रेससोबत आहोत, असं वक्तव्य खासदार अरविंद सावंत यांनी केलंय.
सूरत कोर्टात काय झालं?
चोरों का नाम मोदी ही क्यों होता है.. या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्या कोर्टात गुरुवारी राहुल गांधी यांच्यावरील खटल्यासंबंधी सुनावणी होणार होती. मात्र दोन दिवस आधीच सूरत कोर्टातील न्यायाधीश बदलण्यात आले. असा दावा अरविंद सावंत यांनी केलाय. देशातील लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, असा आरोप शिवसेना नेते करतात. मात्र न्यायव्यवस्थेचा वापरही अशा प्रकारे करता येऊ शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांनी केलाय.
उतावीळ होऊन कारवाई…
राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. याविरोधात त्यांना उच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते. मात्र त्यापूर्वीच लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय उतावीळ होऊन ही कारवाई झाल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलंय.
भाजप आमदार-खासदारांनाही शिक्षा
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप आमदार-खासदारांनाही अशा शिक्षा झाल्याचं दाखवून दिलं. विनायक राऊत म्हणाले, ‘ या देशात अनेक आमदार-खासदार आहेत, ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा या मिंधे सरकारचे काही आमदार असे आहेत. अलिबाग, जळगावचे आमदार,अमरावतीच्या खासदार आहेत की त्यांना दोन वर्षाची सजा झालेले. दहा-दहा लाख रुपये दंड झालेल्या तरी त्यांची लोकशाहीचा पूर्णपणे मुडदा पाडायचं आणि आपली खुनशी राजवट चालू करायचे हा धंदा सुरु आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली. अलिबागच्या आमदार महेंद्र दळवी, जळगावच्या सोनवणे यांना शिक्षा झाली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना तर सर्वोच्च उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा आणि दहा लाखाचा दंड आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई अशा पद्धतीच्या शिक्षा सुनावल्या गेल्या. त्यांची आमदारकी खासदारकी गेली नाही. परंतु राहुल गांधींची खासदारकी मात्र 24 तासाच्या आत घालवण्याचे झाले, हे निंदनीय असल्याची तीव्र प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली.