शकुनीमामा आता दुसरे घर फोडणार, भाजप आमदाराचा ‘या’ नेत्यावर हल्लाबोल
पुढच्या अधिवेशनात वरच्या सभागृहात उबाठा गटाचा विरोधी पक्ष नेता राहणार नाही. राज्यातली महाविकास आघाडी संपलेली आहे. महाविकास आघाडी सरकार अंत्यसंस्कार झालेले आहेत. काल महाविकास आघाडी फोटोला हार घातला आहे.
मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडामुळे गेली २५ वर्ष एकसंघ असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीरतेच्या मार्गावर उभा राहिला आहे. महाविकास आघाडी स्थापन करून शरद पवार यांनी नवी राजकीय खेळी खेळली. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून या महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला. तर, अजित पवार यांच्या रूपाने दुसरा धक्का बसला. त्यातच अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे घर फोडल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. मात्र, भाजप आमदाराने या फोडाफोदीचे खापर शिवसेना नेत्यावर फोडले आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र झोडले आहे. काल झालेल्या शपथविधीवर सामनामधून संजय राऊत याने अकलेचे तारे तोडले आहेत. महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल करण्याचे काम तुम्ही सुरु केले आहे. घाणेरड्या राजकारणाची सुरुवात तुम्ही केली अशी टीका नितेश राणे यांनी केली.
संजय राऊत तुझ्यासारखे शकुनी मामाने राजकारण केले आहे. हे लोकांचे घर फोडण्याचे काम करत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भांडण लावण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी पहिले ठाकरे यांचे घर फोडले आणि आता शरद पवारांचे घर देखील फोडायचे काम केले. ही दोन घरे फोडल्यानंतर आता त्याचे पुढचे टार्गेट काँग्रेस आहे. ते ही घर फोडायला ते निघाले आहेत अशी टीका राणे यांनी केली.
नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यापासून सावध राहा असे आवाहन मी त्यांना करत आहे. छगन भुजबळ यांनी काल बैठकीमध्ये सांगितले की 2024 मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान राहणार आहेत. त्यामुळे शकूनी मामा काय म्हणतो त्याला महत्व नाही. शकुनीमामा हे सरकार पडणार आहे. मुख्यमंत्री पडणार आहे असे म्हणतो. पण, यापेक्षा अंबादास दानवे तुमचा विरोधी पक्षनेता राहतो का ते बघा, असा टोलाही त्यांनी लगावला.