मोदींनी खिडकी काय दरवाजा उघडला तरी काही फरक पडणार नाही – संजय राऊत
बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कधीच विसरू शकत नाही. माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या या विधानाचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. मोदींचं बाळासाहेबांबद्दल असलेलं प्रेम खोटं आहे, त्यांचे नक्राश्रू आहेत, अशी टीका त्यांनी केली.
बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कधीच विसरू शकत नाही. माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी हे भावूक झाले होते. मात्र त्यांच्या या विधानावरून शिवसेना ठाकरे गट संतापला असून मोदींचं बाळासाहेबांबद्दल असलेलं प्रेम खोटं आहे, त्यांचे नक्राश्रू आहेत, अशी टीका करत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदींनी खिडकी काय दरवाजा उघडला तरी काही फरक पडणार नाही, आम्ही समोर उभ राहणार असे म्हणत त्यांनी शिवसेना -भाजपचे पुन्हा मनोमिलन होण्याच्या शक्यता फेटाळल्या.
मोदींचं प्रेम खोटं
नरेंद्र मोदींनी यांनीच महाराष्ट्रात आणि शिवसेनेत अडचणी निर्माण केल्या. मोदी यांचा बाळासाहेबांवर एवढं प्रेम असतं तर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना अशा प्रकारे फोडली नसती. नुसती तोडली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नावं एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं, त्यांचा धनुष्यबाण हे चिन्ह एका बेईमान व्यक्तीच्या हातावर ठेवलं नसतं, अशी टीका राऊत यांनी केली. मोदींचं उफाळून आलेलं प्रेम खोटं आहे ते नकाश्रू आहेत असं ते म्हणाले.
आम्ही त्या दरवाजासमोर उभं राहणार नाही
उद्धव ठाकरे अडचणीत असतील तर त्यांना मदत करणारी पहिली व्यक्ती मीच असेन, असं वक्तव्यही मोदी यांनी केलं. ते उद्धव ठाकरेंसमोर एक खिडकी उघडत आहेत का, असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. त्यावरही राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिलं. खिडकी काय, मोदींनी दरवाजे उघडले तरी काहीच फरक पडत नाहीत, आम्ही त्यासमोर उभं राहणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात अजून शिल्लक आहे, असेही ते म्हणाले.
ते जर असं वागत असतील तर याचा अर्थ एकच की मोदींना बहुमत मिळत नाहीये, त्यांचा पराभव होतोय हे दिसंतय म्हणून ते अशा फटी, दरवाजे शोधत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला. मोदी, शहा, अडचणीत आहेत, त्यामुळे असे बोलत आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.
ठाकरेंविरोधात बोलणार नाही
बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. कर्ज विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं कारण पंतप्रधानांनी दिलं. त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन, असं मोदी म्हणाले. टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतीत पंतप्रधानांनी ही भूमिका जाहीर केली.