याला मिंधे सरकार, फडणवीस जबाबदार – अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊत भडकले
मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच माजी गृहमंत्र्यावर हल्ला होतो. या दोन्ही घटना म्हणजे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले धिंडवडे आहेत, आणि याला मिंधे सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली
राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार, मंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर काला नागपूरमध्ये काल अत्यंत निर्घृण हल्ला झाला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेले देशमुख रक्बंबाळ झाले, अत्यवस्थ होते. आणि हा हल्ला करताना भारतीय जनता पक्ष जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर ठार मारण्याच्या हेतून हल्ला होतो. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच माजी गृहमंत्र्यावर हल्ला होतो. या दोन्ही घटना म्हणजे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले धिंडवडे आहेत, आणि याला मिंधे सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. अनिल देशमुख यांच्यावर काल झालेल्या हल्ल्याचा त्यांनी कडाडून निषेध केला.
निवडणूक काळात राज्याच्या प्रासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. तरीही भाजपच्या काळात गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो. राज्याच्या माजी गृहमंत्र्यावर झालेल्या या निर्घृण हल्ल्यानंतर राज्यात कायदा- सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे. देंवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात जबाबादारी स्वीकारली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. उद्या निवडणुकीच्या मतदानापूर्वी विरोधा पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना धमक्या येतील, किती जणांवर हल्ले होतील, किती जणांवर खोटे गुन्हे दाखल केले जातील याविषयी आम्हाला चिंता वाटते, असेही राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही
तुमचे पंतप्रधान, तुमचे नेते नेहमी स्टंट करत असतात. आम्हाला नरेंद्र मोदींकडून स्टंट शिकण्याची गरज नाही. भाजपची ही नौटंकी सुरू आहे. महाराष्ट्रात यापूर्वी निवडणुकीत असं वातावरण कधी दिसलं नव्हतं. माजी गृहमंत्र्यांवर हल्ला झाल्याची घटना कोणत्याही निवडणुकीत दिसली नव्हती, ते देवेंद्र फडणवीस, अमित शाहांच्या काळात झालंय अशा शब्दांत राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. यांच्या हातात कायदा-सुव्यवस्था सुरक्षित नसल्याची टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरेंना गांभीर्याने घेत नाही
राज ठाकरे गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षानं दिलेलं स्क्रिप्ट वाचत आहेत. ते कधी नारायण राणेंनी दिलेलं स्क्रिप्ट वाचतात तर कधी एकनाथ शिंदेनी दिलेलं स्क्रिप्ट वाचतात. शिवसेनेच्या बाबतीत त्यांना ( राज ठाकरे) गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. त्यांनी स्वत: शिवसेना सोडली, स्वत:चा पक्ष स्थापन केला. आणि आत्ता नरेंद्र मोदी, अमित शाह आणि फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल, अशी त्यांची भूमिका आहे. महाराष्ट्र त्यांना फारसा गांभीर्याने घेत नाही.