कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण, ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, म्हणाले “पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर…”
श्रीमान फडणवीस, मिंधे याचा खुलासा करा. करावाच लागेल. सरकार तुमचे असेल, पण हे राज्य ‘मऱ्हाटी’ आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दात राज्य सरकारवर घणाघात करण्यात आला.
कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर अमराठी माणसाने अमानुष हल्ला केला. धूप-अगरबत्ती लावण्यावरुन हा किरकोळ वाद सुरु झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. एका परप्रांतीय कुटुंबाने बाहेरुन गुंड आणून कारण नसताना लोखंडी रॉडने मराठी कुटुंबाला मारहाण केली. या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले. कल्याण पश्चिमेला असलेल्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी रात्री हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. याचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली आहे. मराठी माणूस तुडवला जातोय! मिंध्यांनो, पेढे वाटा! या आशयाखाली सामना अग्रलेख पाहायला मिळत आहे. कल्याणचा हा शुक्ला कोण? त्याचा बाप कोण? कोणाच्या जिवावर तो मराठी माणसांना धमक्या देत आहे? मुख्यमंत्री कार्यालयातील त्याचा दलाल कोण? श्रीमान फडणवीस, मिंधे याचा खुलासा करा. करावाच लागेल. सरकार तुमचे असेल, पण हे राज्य ‘मऱ्हाटी’ आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दात राज्य सरकारवर घणाघात करण्यात आला.
“मिंध्यांनो, पेढे वाटा, पेढे वाटा, महाराष्ट्र खरेच कमजोर झालाय”
“आज मुंबई, ठाण्यात, पुण्यात, नाशिकात मराठी माणसांवर हल्ले सुरू आहेत. उद्या हे लोण नागपूर, अमरावती, जळगावपर्यंत पोहोचेल व महाराष्ट्र कमजोर करून मोदी–शहा–फडणवीसांचा दास बनून पायाशी पडेल. शिवसेना तोडून सत्तेसाठी सरकारसोबत गेलेले मिंधे पेढे वाटण्यासाठी त्याच क्षणाची वाट पाहत आहेत. कल्याणचा हा शुक्ला कोण? त्याचा बाप कोण? कोणाच्या जिवावर तो मराठी माणसांना धमक्या देत आहे? मुख्यमंत्री कार्यालयातील त्याचा दलाल कोण? श्रीमान फडणवीस, मिंधे याचा खुलासा करा. करावाच लागेल. सरकार तुमचे असेल, पण हे राज्य ‘मऱ्हाटी’ आहे हे लक्षात ठेवा. शुक्ला मंत्रालयातला तुमचा नोकर असेल तर त्याच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा, की त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल? मिंध्यांनो, पेढे वाटा, पेढे वाटा, महाराष्ट्र खरेच कमजोर झालाय!”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“फडणवीसांचे पोलीस त्या शुक्लासमोर नांगी टाकतात”
“महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना पाशवी बहुमत मिळाले. त्या पाशवी बहुमतातून आलेले सरकार हे नपुंसक आहे. बहुमत आहे, पण ते बहुमत खरे नाही. तसे नसते तर मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ परिसरात मराठी माणसांवर निर्घृण हल्ले झाले नसते. मराठीद्वेष्टय़ांना वाटते, महाराष्ट्रात आता आपले सरकार आले आहे. त्यामुळे मराठी माणसाला लाथाडले, तुडवले तरी आपले कोण काय वाकडे करणार? या मस्तीत ते आहेत. कल्याणच्या उच्चभ्रू वस्तीत कोणी अखिलेश शुक्ला नामक उपऱ्याने गुंड टोळ्यांच्या मदतीने मराठी कुटुंबावर हल्ला केला. मराठी माणसे मच्छी-मटण खातात, ती घाणेरडी आहेत या सबबीखाली शुक्ला व त्याचे गुंड कल्याण परिसरात झुंडशाही करतात आणि फडणवीसांचे पोलीस त्या शुक्लासमोर नांगी टाकतात”, असा आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे.
फडणवीसांचे सरकार हा लोकमताचा कौल नाही
“मराठी माणसांवरील हल्ल्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे समर्थन आहे असे समजायचे काय? मराठी माणूस माझ्यासमोर झाडू मारतात, अशी गुर्मीची मस्तवाल भाषा करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. त्यास मोदी-शहा-फडणवीस यांचे महाराष्ट्र कमजोर करण्याचे धोरण कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीच या त्रिकुटाने शिवसेना फोडली. फडणवीसांचे सरकार हा काही लोकमताचा कौल नाही. विधानसभेतील भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बहुमत दिल्याबद्दल राज्याच्या 14 कोटी जनतेचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी बहुमत मिळाल्याबद्दल ईव्हीएम, पैसा, ईडी, सीबीआयचे आभार मानायला हवे होते”, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.