“लाडकी बहीण योजनेची ‘इव्हेंट’बाजी करणाऱ्या खोकेशाही सरकारने शेतकऱ्यांना….”, संजय राऊतांनी सुनावले खडे बोल
आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut demand help Farmers : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाने मराठवाडा, विदर्भ या भागातील जिल्ह्यांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. शेतात काढणीला आलेली अनेक पिकं डोळ्यासमोर जमीनदोस्त झाली आहेत. आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे सुख निसर्गाला का बघवले जात नसेल हे कळावयास मार्ग नाही. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसतो व त्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकांचा घास निसर्ग हिरावून नेतो. कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट अशा संकटांशी या दोन्ही विभागांतील शेतकऱ्यांना कायमच दोन हात करावे लागतात. आताही तेच झाले आहे. सरल्या आठवडय़ाच्या अखेरीस मराठवाड्यातील सर्व जिल्हे व विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. अवघ्या काही तासांत सर्व नदीनाल्यांना पूर आला. अनेक गावांना पुराचा वेढा पडला. शेतांचे रूपांतर तळ्यांमध्ये झाले. शेतातील सारी पिके शेतकऱ्यांच्या डोळय़ांदेखत जमीनदोस्त झाली, असे संजय राऊत म्हणाले.
“सरकारने तत्काळ पावले उचलायला हवीत”
मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत एकंदर 12 जणांचा मृत्यू झाला. दीडशेहून अधिक जनावरे वाहून गेली किंवा मृत्युमुखी पडली. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या अतिवृष्टीने मराठवाड्यातील सुमारे 8 ते 10 लाख हेक्टरवरील जिरायत शेतीचे भयंकर नुकसान केले. गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या भयंकर अतिवृष्टीने संपूर्ण मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. जलमय झालेल्या शेतशिवारांत काढणीला आलेली व बहरलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत जमीनदोस्त झाली. या भयंकर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलायला हवीत, अशी मागणी संजय राऊतांनी केली.
“हवे तर तुमचे आवडते इव्हेंट करा, पण…”
‘लाडकी बहीण’ योजनेची ‘इव्हेंट’बाजी करण्यात रमलेल्या खोकेशाही सरकारने अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे दुःखही समजून घेतले पाहिजे. हवे तर तुमचे आवडते इव्हेंट करा, पण शेतकरी जगवण्यासाठी बांधावर जाऊन त्यांना आर्थिक मदत दिलीच पाहिजे, असा टोलाही संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून लगावला.