Santosh bangar | आमदार संतोष बांगर यांना तलवार बाहेर काढणं चांगलच महाग पडलं, थेट ‘ही’ कारवाई
Santosh bangar | संतोष बांगर यांनी तलवार का बाहेर काढली?. रविवारी हिंगोलीत उद्धव ठाकरे यांची सभा झाली. "हिंगोली नेहमीच शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचाराच्या मागे उभी राहिलीय. गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहे" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबई : सतत चर्चेत असणारे आमदार म्हणजे संतोष बांगर. ते शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार आहेत. संतोष बांगर यांची एखादी कृती किंवा वक्तव्यावरुन वाद निर्माण होत असतो. संतोष बांगर आता पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. रविवारी हिंगोलीत उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेनंतरच दुसऱ्यादिवशी म्हणजे सोमवारी संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती.
या कावड यात्रेच्या माध्यमातून संतोष बांगर यांनी शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर त्यांनी एक कृती केली, त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. संतोष बांगर यांनी उपस्थित जनसमुदायासमोर तलवार काढून दाखवली. डीजेला परवानगी नसताना, डीजे लावला. या प्रकरणी कळमनुरी पोलीसात गुन्हे दाखल झाले आहेत.
‘उद्धटपणा चिरडून गाडून टाकावा लागेल’
काल हजारों शिवभक्तांच्या उपस्थितीत आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. रविवारी उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा झाली. त्यावेळी ते म्हणाले की, “हिंगोली नेहमीच शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचाराच्या मागे उभी राहिलीय. गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहे. त्यात फक्त हवा आहे, ताकत माझ्याकडे आहे” “आपल्याच माणसावर, उद्धटपणा करणार असेल, तर याचा उद्धटपणा चिरडून गाडून टाकावा लागेल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘बेंडकुळ्या आहेत, तेच दाखवतील’
त्यावर संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं. “बेंडकुळ्या आहेत, तेच दाखवतील. खऱ्या बेंडकुळ्या कुठे असतील, तर मायबाप जनता आहे” असं संतोष बांगर म्हणाले. “शिंदे गटाने माझा बाप चोरला. ही बाप चोरणारी टोळी आहे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना बांगर म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांचे आहेत. त्यामुळे आमचा बाप चोरला असं कुणीही म्हणू नये” ‘कंडक्टरला मी खरंच सांगतो पायाखाली तुडवेन’
नुकतेच एका सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्यामुळे संतोष बांगर अडचणीत आले होते. “मुली ज्या पद्धतीने बोलत आहेत, तिथे कोण कंडक्टर आहे, तो म्हणतो की, तुमच्या बापाची बस आहे का, बसमधून खाली उतरवतो. अशा कंडक्टरला मी खरंच सांगतो पायाखाली तुडवेन. तुम्हाला माझ्या स्वभावाची कल्पना आहे. मी जेवढा चांगला आहे, तेवढाच खराब आहे. मला कमी-जास्त वाटलं तर मी त्याला मारेन. मला काहीच सांगू नका” संतोष बांगर यांनी अशी भाषा वापरली होती.